Friday, October 31, 2014

                            टीनेजर्स आणि उच्चशिक्षण 
     " शिक्षण ही काळाची गरज आहे ". असं आपण या जगात आल्यापासूनच ऐकत आहोत . पिढ्यानपिढ्या रूढ झालेली ही म्हण किंवा सत्यच म्हणायला हरकत नाही पण आता थोडीशी बदलायला लागली आहे . आता शिक्षणाला उच्चशिक्षणाची साथ मिळाली तर माणसाच्या आयुष्यातली प्रगतीची पाउल फक्त उमटणार नाहीत तर ठळकपणे दिसूनही येतील .  आणि इतरांना असा आदर्श प्रगतीचा मार्ग आपणही धरावा अशी इच्छा होईल . त्यामुळे आता " उच्चशिक्षण ही काळाची गरज बनली आहे  ".
    “ शिक्षण ” या एकाच शब्दाला अनन्यसाधारण महत्व आणि विचार करू तितके पैलू आहेत . खरतरं , शिक्षण हे कोणत्याही एका वयोगटाशी कधीच मर्यादित नव्हत आणि नसेलही . कारण या पृथ्वीतलावर मानवाची निर्मिती झाल्यापासूनच प्रत्यक्ष   अप्रत्यक्षरित्या प्रत्येक क्षणी घेतलेलं शिक्षण हे होतच आणि कळत नकळतपणे परीक्षासुद्धा होत्याच .   अगदी आदिमानवापासून विचार करायचा झाला तर या सृष्टीला आपलस करताना त्याने निसर्गाच्या अनेक परीक्षा दिल्या . त्यात उत्तीर्ण होत होत आज बऱ्याच उंच पातळीवर आला आहे . आदिमानवाचा मानव , मानवाचा माणूस , माणसाचा सर्वसामान्य किंवा असामान्य व्यक्तिमत्व , शिक्षित , उच्चशिक्षित पिढी अश्याप्रकारे प्रगतीच होत गेली . सगळ्यातला माणूस हा अर्थ कायम राहूनही प्रगती झपाट्याने होत गेली . आणि यात विशेष म्हणजे शिक्षणच या प्रगतीच्या वाटेवरचा आदिमानवापासून पाठीराखा होता . जसं ते निसर्गाच्या प्रत्येक काळाशी संबंधित आहे त्याप्रमाणे प्रत्येक वयोगटाशी .   लहान मूल जन्माला आल्यापासूनच कुतूहलाने पाहत पाहतच स्वतःचा शिक्षण प्रवास सुरु करत असतात  ते अगदी थेट आजी - आजोबांच्या वयापर्यंत . वयाने मोठे असले तरी मनाने तरुण असलेला हा वर्ग स्वतःला विद्यार्थी समजण्यातच आयुष्याच सार्थक मानत असतो . कारण या ज्ञानाच्या प्रचंड महासागरात आपण विधार्थी म्हणूनच पोहू शकतो असा संस्कारच या पिढीवर झालेला असतो जो अर्थात पिढ्यानपिढ्या चालत येउन " शिक्षण " या शब्दाचाच समानार्थी अर्थ बनून जातो . पण हा झाला आपल्या आयुष्यातल्या एकूणच " शिक्षण " या विचाराशी असलेला संस्कार . हाच संस्कार अतिशय प्रगल्भतेने समोर येतो ते टीनेजर्सच्या वयात .
        टीनेजर्स अत्यंत उत्साही , अवखळ , निरागस तरी दंगा मस्ती , शिवाय अनेक बदलत्या भावनांचा संमिश्र काळ , आणि करियर मधल्या  " क " ची झालेली खरी सुरुवात अस म्हणायला हरकत नाही .      आयुष्यात " बालपण " जसा हृदयातला एक कोपरा आपसूकच बनून जातो त्याचप्रमाणे तरुण वयातला हा टीनेज काळ आयुष्यातला विशेष भाग बनून जातो . या अश्या उत्साही , किंवा अतिउत्साही , स्वतःच्या विश्वात रमणाऱ्या या टीनेजर मंडळीना करियर मात्र हटके निवडायचं असतं . सगळ्यांपेक्षा वेगळ काहीतरी करण्याच्या महत्वाकांक्षा उफाळून येण्याचं हे हक्काचं वय . कधी कधी अपरिपक्व विचार असले तरी स्वतःचे विचार असतात . काळ जसा बदलला त्याप्रमणे टीनेजर्स सुद्धा करियरच्या बाबतीत प्रक्टिकल होताना दिसत आहेत .
    पूर्वी या टीनेजर्सचा शिक्षणाकडे बघण्याचा  विचार परिस्थितीप्रमाणे असायचा  जो आता कालानुपरत्वे बदलताना दिसतोय .  अगदी पूर्वी , म्हणजे अगदी स्वातंत्र्यानंतर लगेचच्याच  काळात सातवी पर्यंत किंवा १० वी पर्यंतच शिक्षण खूप होत . तेच त्यावेळेच उच्चशिक्षण . पण त्यानंतरच्या काळात बीए , बीकॉम , बीएसी हे शिक्षण खूप काही मिळवल्यासारख वाटायचं . तेव्हाच्या एकंदारीतच आर्थिक परिस्थितीप्रमाणे अपवादात्मकतेने    बोलायचं झालं तर मुलं नोकरी करत शिक्षण घेण , किंवा शिक्षणानंतर लगेचच नोकरीला लागण  , आयुष्याची घडी बसवण अश्या काहीश्या विचारांची होती . पण आत्ताची ही टीनेजर मंडळी या सगळ्याच ठराविक साच्याबाहेर येउन विचार करायला लागली आहे . एकच पोस्ट graduate डीग्री घेण्याचा विचार कधीच मागे पडतोय या विचारला स्वीकारूनच उच्चशिक्षणाचे अनेक plannings ही मूल करताना दिसतात . आता " वाचाल तर वाचाल " या म्हणीसोबत " शिकाल तर टिकाल "  या म्हणीला सुद्धा सर्वमान्यता मिळू शकते . आणि विशेषतः उच्चशिक्षणाच्या बाबतीत . बीए , बीकॉम , बीएसी या पदव्या आता उच्चशिक्षणाची पहिली पायरी स्वीकारण्याचा काळ आहे . दोन दोन , तीन तीन डीग्री घेऊनच या शिक्षणाला आणि त्यातून मिळणाऱ्या नंतरच्या उत्पन्नाला अर्थ आहे . त्यामुळे आजकाल एक पोस्ट graduate डीग्री घेतल्यानंतर अनेक वेळा नोकरी फक्त अनुभव घेण्यासाठी केली जाते . पण आता  अनुभव घेण्यासाठी  नोकरी करणं असा विचार येउन तिथून खरा शैक्षणिक  प्रवास सुरु होताना दिसतोय . ज्यामध्ये पुढच्या काही डीग्रीज साठी परदेशगमन हा मार्ग आज अनेकांसाठी आवडीचा मार्ग बनलेला आहे .   पूर्वीच्या तुलनेत हा खूप मोठा फरक आहे कारण एकदा पदवी हातात आल्यानंतर नोकरी हाच विचार असायचा . त्यानंतर परत पुढचे शिक्षण या पर्यायाचा विचार अगदी क्वचितच केला जायचा .
    या शिक्षणप्रणालीतले हे बदल काही मुख्य कारणांमुळे होताना दिसले . अर्थात , त्यामध्ये काळ बदलला तशी परिस्थिती बदलते हा विचार आहेच पण जागतिकीकरण , खाजगीकरण , उदारीकरण या त्रिसूत्रीने लक्षणीय बदल घडवले . मग ते कोणताही क्षेत्र असो , शांतचित्ताने चाललेलं हे जग अचानक स्पर्धेच्या महासागरात पोहू लागलं . आणि या स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी उच्चशिक्षणाचा  भलामोठा आधार देणारा पर्याय आज टीनेजर्स मंडळींसमोर उभा आहे. आणि सर्वोत्कृष्ट शिक्षण जिथे मिळेल तिथे जाण्यासाठी त्यांची मानसिक , आर्थिक , कौटुंबिक तयारीसुद्धा दिसते आहे . आज बऱ्याच अंशी मुलांच्या मनात काही विचार पक्के असतात . जस की , जे क्षेत्र आपल्याला आवडेल , जिथे आपला कल आहे तिथेच त्याच क्षेत्रात करियर करायचं . अर्थात या विचारसरणीला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत जस की हाच विचार समोर घेऊन आलेले सिनेमे , पुस्तकं , शिवाय मानसशास्त्र विषयातली जागृती आणि प्रगती या मूळे समोर आलेले काउन्सिलिंग आणि IQ टेस्टस या गोष्टींचासुद्धा विद्यार्थी लाभ घेताना दिसतात . आणि अगदीच या टेस्ट वगेरे केल्या नाहीत तरी स्वतःला ज्या क्षेत्रात आवड आहे तोच विषय करियर म्हणून निवडला जातो . त्यामुळे जागतिकीकरण , खाजगीकरण , उदारीकरण यांच्या आगमनामुळे त्या आधुनिकतेत पुढे राहण्यासाठी , टिकण्यासाठी , स्पर्धेला समोर जाण्यासाठी , सर्वोत्कृष्ट संधीपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवण आज टिनेजर्स ना  गरजेच वाटू लागलं आहे .  आज परदेशी जाऊन उच्चशिक्षण घेण्यासाठी त्यांची धडपड अनेकदा दिसून येते . अगदी भरभक्कम फीजच्या सोयीपासून ते युनिवरसिटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या सर्वपूर्वपरीक्षांच planning त्यांच्या डोक्यात आधीपासूनच असतं .  यावरून आजची टिनेजर  मंडळी   दूरदृष्टीचा विचार करणारी आहे हे लक्षात येत . या दूरदृष्टीच्या विचारामुळे उच्चशिक्षणाकडे जाणारी पावलं हळू हळू परदेशी उच्चशिक्षणासाठी सुद्धा वळतात . आणि आज मोठ्याप्रमाणावर अनेकजण तिकडच्या सोयीसुविधामुळे  तिथेच राहणे स्थायिक होणे पंसंत करतात . आणि मग स्वतः मिळवलेली सगळी आर्थिक सुबत्ता स्वतःसाठी आणि परदेशासाठी . मायदेश कायमचाच मागे राहतो . अर्थात या संपूर्ण विषयाला अपवाद नक्कीच आहेत . पण तरी त्यांनी घेतलेलं ज्ञान , उच्चशिक्षण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी वापरण्याचा विचार किंवा प्रयत्न खूप कमीजण करताना दिसतात . नाण्याच्या या सकारात्मक बाजूकडे बघताना नक्कीच आनंद होतो की , या जागतिकीकरण , खाजगीकरण , उदारीकरण या मूळे , शिवाय उच्चशिक्षणाच्या लाटेमुळे हा शैक्षणिक महासागर प्रगती नक्कीच करतो आहे . आणि अर्थात याची सुरुवात  टीनेजर पासूनच होते .

   पण,  नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे बघताना लक्षात येत की , परदेशी उच्चशिक्षणाला आणि एकंदरीतच परदेशी जीवनशैलीला प्रभावित झालेली ही मंडळी जी आत्मकेंद्री आयुष्यात रमते ती मायदेशासोबत स्वतःच्या मायेला , आईला , कुटुंबाला सुद्धा विसरण्याचे धाडस करते . अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलणारे निर्णय असतात . पण खोलवर पाहता थोडस डोळ्यांच्या कडा ओलावणार चित्र सुद्धा या परदेशस्वारीने घडवून आणलं आहे हे नाकारता येणार नाही . आज शिक्षणामुळे आणि या उच्चशिक्षणामूळे खूप मोठ्या प्रमाणावर  सगळ्याच क्षेत्रात प्रगती होताना दिसते आहे . हि मानाचीच गोष्ट आहे . करीयरची शिडी चढायला खरी सुरुवात करणारे टीनेजर्स सुद्धा या एकूणच बदलला सकारात्मकतेने पाहतात आणि निर्णय अमलात सुद्धा आणतात . पण यासोबतच त्यांनी भावनिक दृष्ट्या balanced राहाणसुद्धा तितकाच महत्वाच आहे . कारण या पैशाच्या ओघामध्ये माणसाने त्यांच्यातल्या माणसाला न गमावता माणूस म्हणून कायम जाग राहील पाहिजे . कारण हीच जाणीव शिक्षणाने , उच्चशिक्षणाने दिलेली असते ती नेमक्या वेळी योग्य निर्णय घेऊन सत्कारणी लावण म्हणजेच खर उच्चशिक्षण ठरेल .