Sunday, November 23, 2014

वेळ.. पाळण्याची गोष्ट आहे का?

     काल रात्री झोपेत मला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये माझी परीक्षा चालू होती. माझा पेपर १०-१ या वेळेत होता. झालं असं कि मला घरून निघायला झालं उशीर. त्यात भारतीय रेल्वे आणि वेळापत्रक यांचा तर ३६चाच आकडा असतो. त्यामुळे १०च्या पेपरला मी पोचले १०.३० ला. इतक्या उशिरा गेल्यामुळे मला शिक्षकांनी पेपरला बसूच दिलं नाही. मी खूप रडायला लागले. आणि तेव्हढ्यात मला अचानक पणे जाग आली. हे स्वप्नं होतं हे समजल्यानंतर जरा हायसं वाटलं. पण उठल्यानंतर मी स्वताशीच विचार करत होते. कि खरंच, वेळेचं किती अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या आयुष्यात, आणि आपण मात्र वेळेला अजिबात किंमत देत नाही.
     इंग्रजी भाषेमध्ये एक छान म्हण आहे. “ time is money ”. म्हणजे वेळ हीच जणू काय संपत्ती आहे. आणि खरच आहे नाही का. आपल्या आयुष्यात खरं सांगायचं तर रोज २४ तास, म्हणजेच १४४० मिनिटं, म्हणजेच ८६,४०० सेकंद इतकी संपत्ती रोज जमा होत असते. आणि आपल्या बरोबर इतरांच्या आयुष्यात देखील इतकीच संपत्ती रोजच्या-रोज जमा होत असते. अशा वेळी, आपल्या आयुष्यातील संपत्ती अनमोल आहे हे लक्षात ठेवताना इतरांच्या आयुष्यातील वेळ सुद्धा तितकीच महत्वाची आहे याचं भान आपण सगळ्यांनीच ठेवायला हवं.
मुळात वेळेचं महत्त्व आपण खऱ्या अर्थाने ओळखलंच नाहीये. अनेकदा शुल्लक किंवा कमी महत्वाच्या गोष्टींमध्ये आपण वेळ फुकट घालवत असतो. आणि त्यामुळेच अनेकदा आपल्याला जायचं असत त्या ठिकाणी पोचला उशीर होतो. किंवा आपल्यामुळे अनेक जणांना ताटकळत बसावं लागतं. म्हणजे आपण आपला वेळ फुकट घालवतोच पण त्याच बरोबर इतर अनेक जणांचा वेळ सुद्धा वाया घालवतो हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं.
    time management हे आपल्यापैकी प्रत्येकाने शिकायला हवं. आपल्या दिवसातील सगळी काम, आणि वेळेचं नियोजन योग्य असलं कि आपली सगळी काम वेळच्यावेळी पार पडतात. त्याचसोबत एखाद महत्वाचं काम राहत नाही.पण मुळात त्यासाठी दिवसभरात पार पडायची असलेली काम, त्यांना लागणारा वेळ, आपल्याकडे असणारा वेळ, आणि मुळात प्रवास आणि इतर गोष्टींमध्ये खर्च होणारा वेळ याचं गणित योग्य मांडता यायला हवं. ते गणित एकदा योग्य असलं कि तुमच्या आयुष्याची गाडीचं वेळापत्रक भारतीय रेल्वे सारखं असणार नाही.
याचबरोबर एखाद्या कामाला आवश्यक असणारा वेळ आपण त्याला नक्कीच दिला पाहिजे. पण त्यापेक्षा अधिक वेळ त्यावर घालवून चालणार नाही. एखाद्या दिवशी आपल्याकडे बराच मोकळा वेळ असेल तर त्या दिवशी तो वेळ एकदा छानसा चित्रपट बघण्यात, एखादं नाटक बघण्यात, आपल्या माणसांसोबत तो वेळ घालवून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तर त्यासारखा वेळेचा सदुपयोग दुसरा नसेल. पण आपल्या डोक्यावर पूर्ण करायची अनेक कामं बाकी असताना वेळ फुकट घालवून मग रडत बसण्यात काहीच अर्थ नाही.
     अनेकदा एखादा कार्यक्रम ५ वाजता असेल तर आपण मनाशीच म्हणतो कि ५.३० पर्यंत सुरु होणार नाही तर आपण ५.१५ पर्यंत गेलो तरी चालेल. पण मुळात हा विचारच चुकीचा आहे. वेळ पाळण्याच्या बाबतीत प्रत्येक जण असा विचार करतो म्हणून आपण कधीच कुठची गोष्ट वेळेवर पूर्ण करू शकत नाही. आपण वेळ पाळण्याची सुरुवात स्वतः पासून करायला हवी. आपल्याला भेटायला कोणी उशिरा आलं तर आपल्याला लगेच राग येतो पण हेच जर आपण कोणाला भेटायला जाताना उशिरा गेलो तर आपल्याकडे कारण तयार असतात. त्यामुळे, आपल्यासोबत दुसर्यांच्या वेळेला महत्त्व आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं.
एकदा एक छान विनोद ऐकला होता. कि पुण्यात एके ठिकाणी एक पाटी लिहिली होती, “ कुत्रा, मांजर, गाढव इथपर्यंत आम्ही समजू शकतो, पण वाहतुकीचे नियम आणि वेळ हि काय पाळण्याची गोष्ट आहे का ? ”

     यातला विनोदाचा भाग जरी बाजूला ठेवला तर याचं उत्तर नक्कीच असं आहे कि वेळ हि पाळण्याची गोष्ट आहे आणि आपल्या देशाला तर नक्कीच ती पाळण्याची गरज आहे. मगाशी म्हंटल्याप्रमाणे जर प्रत्येकाने स्वतःत बदल केला आणि वेळेचं महत्त्व ओळखलं तर भारत हा सगळ्यात श्रीमंत देश होण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही...!!! 

Thursday, November 20, 2014

                        एलीझाबेथ एकादशी........


   
   मागच्याच आठवड्यात चित्रपट पाहून आले. नेहमी असं होत बघा...चित्रपट आपल्याला आवडला की तो कायम डोक्यात बसतो. मग त्यात आपल्याला आवडलेली वाक्य..संवाद. त्यातला एखादा प्रसंग...वगेरे वगैरे....पण असच या चित्रपटात मला मनापासून आवडलेल्या काही गोष्टी शेअर करण्याच हेच उत्तम मध्यम आहे. याला मी केलेली समीक्षा म्हणता येणार नाही. कारण त्यासाठी एका विषयातलं तज्ञ असाव लागत....अजून तरी तज्ञ व्हयला वेळ आहे. प्रयत्न चालू आहेत. पण सध्यापुरत....मला आवडलेला चित्रपट या विचारानिशी माझी लेखणी मी सुरु करतेय.....

    नुकताच पाहिलेला एक अप्रतिम चित्रपट. लहानमुलांच भावविश्व अगदी सहजतेने आपल्या समोर येत आणि आपलसं होऊन जात. चित्रपट सुरु झाल्यापासूनच अगदी सुरुवातीच्या नावांपासून आणि त्यात असलेल ग्राफिक्स शिवाय ती अनोखी आणि आगळीवेगळी सायकल लगेचच लक्ष वेधून घेते. “ दगड दगड दगड.....हे मुलांच्या आवाजातलं गाण ऐकायला नक्कीच मजा येते.
    चित्रपटात मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे त्यात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत दाखवलेला साधेपणा. आर्थिक परिस्थिती बेताची असताना सुद्धा, काळजी असूनसुद्धा  चेहऱ्यावर मात्र  हास्य.किंवा कुठेही फारशी सतत जाणवणारी चिंता नाही. जरी ती असली तरी खूप विचारकरून धडपड करणार कुटुंब.  मुलांच्या शिक्षणावर असलेला भर. त्याचसोबत  मुलांना परिस्थितीची असलेली जाण. या गोष्टी मला खूप सकारात्मक वाटल्या.
    पंढरपुर गाव , पंढरीची वारी पाहिल्यावर जरी आपण कधी गेलो नसलो तर आपण या चित्रपटाच्या माध्यमातून पंढरपूर फिरून आलो असाच काहीसा भास होतो. इतक  वास्तववादी चित्रण या चित्रपट केल आहे.
    लहान मुलांना त्यांची स्वतःची एखादी गोष्ट असेल तर ती गोष्ट अगदी मनापासून , आणि जीवापाड जपताना दिसतात. तशीच या चित्रपटातली सायकल त्यांना जीवापेक्षा जास्त महत्वाची असते. आणि ती कायम आपल्यासोबतच असावी या साठी तीच केलेलं नामकरण अर्थातच “ एलीझाबेद ”. कारण या शब्दामध्ये अनेक वर्ष टिकण्याची ताकद आहे असा मुलांचा निरागस समज. या निरागसतेमध्ये लक्षात राहीलं ते भावा- बहिणीच नात. वारीमध्ये आईला न सांगता  टाकलेलं बांगड्यांच छोटस दुकान . पण आईलाच पैशाची थोडीफार मदत व्हावी ही इच्छा . पण आईचा विरोध असताना दुकान टाकण्याच केलेलं धाडस आणि तिला कळू नये म्हणून या चिमुकल्या बहिण भावंडांची एकमेकांना असलेली अगदी यथायोग्य साथ कौतुकास्पद वाटते. त्यात सगळ्यात जास्त भावलेला प्रसंग म्हणजे जेव्हा तो वडापाव विकत घेतो तेव्हा स्वतः न घेता बहिणीला आधी विचारतो . आणि दुसरा म्हणजे काही कारणांमुळे वारीत झालेल्या भांडणामुळे , मारामारीमुळे त्याचं छोटस दुकान विस्कटून जात... आणि एकूणच नुकसान होत. तेव्हा लहान बहिणीला लागत , रक्त येत....ती रडायला लागते. त्यावेळी सगळ्याच लहान मुलांची झालेली धावपळ. आणि त्यात तो महागातला बांगड्यांचा बॉक्स शोधण्याची त्यांना त्यावेळी वाटलेली गरज दिसून येते. पण तरी इतके लहान असून सुद्धा कोणीही रडत नाही. आता काय होईल म्हणून घाबरून बसत नाही. प्रोब्लेम वर सोल्युशन शोधायला सगळेच तयार असतात. त्या गोंधळात सुद्धा त्या छोट्या भावाची बहिणीविषयी असलेली काळजी दिसून येते. “लागल आहे तर येऊ नकोस आम्ही जाऊन येतो.” असे काहीसे त्याचे काळजीचे शब्द पण तरी बहिणीवर या प्रसंगाचा अजिबात तो राग वगेरे काढताना दिसत नाही. आहे त्या प्रसंगाला सामोरे जातो.
    परेश मोकाशी याचं अप्रतिम दिग्दर्शन आणि मधुगंधा कुलकर्णी याचं लिखाण यामुळे चित्रपटाला एक वेगळाच बाज आला आहे. खूप कमी पण  नेमक्या  शब्दांमधून पोचणारा हा चित्रपट आहे. शिवाय प्रत्येक कलाकाराने हावभावामधून तर हा विषय...त्याचा गाभा पोह्चावालाच आहे......

जाता जाता इतकच...चित्रपट जरूर बघा......न्यूटनने सांगितलेलं सायन्स एका वेगळ्याच शैलीत ऐकण्यासाठी तर नक्कीच पाहावा असा चित्रपट आहे. 

                     आणि ट्रेन बोलू लागली......

   नेहमीप्रमाणे दिवसाची धावपळीत सुरुवात झाली. पण त्यादिवशीची धावपळ फक्त माझीच होती . बाकी  सगळ्यांसाठी तो  दिवस सगळ्यांचा आवडता , लाडका असा होता .. अर्थात रविवार. पण मला माझ्या काही कामानिमित्त रविवार नेहमीच्या वारांप्रमाणेच धावपळीत घालवण्याच भाग्य त्यादिवशी लाभल होत. भाग्य म्हणण्याच विशेष कारण असं कि मुंबईकरांसाठी रोजची धावपळ हाच एक व्यायाम असतो जो ते अगदी  नियमितपने  करतात. आणि त्यामुळे माझा रविवारचा व्यायाम चुकणार नव्हता हेच केवढे मोठे भाग्य  !!
   असो...पण माझा दिवस जरी सगळ्यांच्या आधी सुरु झाला असला तरी रविवार म्हणजे सगळच आरामात असत .नेहमी स्टेशन वर असणारी भयानक गर्दी.. कोणालाही कोणाची नसलेली फिकीर...मी आणि माझी ट्रेन हेच काय ते नात आणि हेच समीकरण आणि हाच काय तो स्टेशन वरचा आयुष्यभर मनात कोरून ठेवलेला पास. अश्या पद्धतीने सगळ्यांचा वावर....या दृश्याला त्यादिवशी छोटीशी सुट्टी होती. ट्रेन आली ...शांतपणे चढले ...आणि नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये डोक खुपसून बसले. नेहमी ट्रेन मध्ये असणारी गर्दी नसल्यामुळे आज ट्रेनला बहुतेक चुकल्याचुकल्या सारखे वाटल असणार....काही वेळाने ट्रेन च माझ्याशी बोलू लागली....
आज गर्दी नाहीये म्हणून मला तू दिसलीस तरी......ट्रेन थोड हसतच म्हणाली....
मला काही क्षण विश्वासच बसला नाही....की छे....ट्रेन कशी बोलू शकते...काही काय....मला उगाच भास होत्यात....असं काहीस मनात घोळत असतानाच ट्रेन ने ओळ्खल आणि म्हणाली , ‘’ अग...इतका विचार का करतेयस ?’’ मी खरच ट्रेन बोलतेय .....आणि साहजिक आहे ग...तुला असं काहीस वाटण पण मी एरवी काही बोलले तर बाकी गर्दीत माझा आवाज येतोय कुणाला ऐकू ?? ट्रेन हे सुद्धा हसत म्हणाली...
आता मला थोड नाही जरा जास्तच आश्चर्य वाटल...ट्रेन ला आम्ही प्रवासी इतकी नाव ठेवतो...साध काही एक दोन मिनिट तिला यायला मागे पुढे झाली की तिच्यावरच राग काढतो...साध नुकतच वेळापत्रक बदललं तरीसुद्धा राग राग करतो....कधी बसायला मिळाल नाही किंवा सिग्नल लागला , पंखे चालत नसतील तरी तिलाच बोलतो....एकूणच काय तर तिला बोलायची तशी एकही संधी आम्ही कोणीच सोडत नाही पण तरी ती आमच्याशी किती हसून , आनंदाने  बोलते.....
तिच्या या अश्या स्वागतार्ह बोलण्यामुळे मला ट्रेन शीच ट्रेन मध्ये गप्पा माराव्याश्या वाटण आता अगदीच साहजिक आहे यात काही नवल नाही.....नाही का ??
तर अशी झाली आमच्या गप्पांची सुरुवात.......
मग तिला सुद्धा माझ्याशी बोलावस वाटल कारण माझा काहीसा विश्वास बसलाय हे तिच्या लक्षात आल. आणि कोणतेही आढेवेढे ण घेता किंवा औपाराचारीकता ण ठेवता तिने बोलायला सुरुवात केली....
“ शेवटी कस असत ना ...सगळ काही विश्वासावर च चालत असतं..आज जर तू माझ्यावर विश्वास ठेवला नसतास तर मला तुझ्याशी सगळ्यांची प्रवासी प्रतिनिधी म्हणून ज्या गप्पा मारायच्या आहेत त्या मारताच आल्या नसत्या......
माझं मान डोलावण पाहून तीच पुढे बोलत होती....
तुला खर सांगू का ?....मला ट्रेन असल्याचा अभिमान आहे. कारण आज माझी अनेकांना गरज आहे. आज अनेकांना त्यांच्या कर्मभूमी पर्यंत नेण्याचं काम मी रोज नियमितपणे करते. पण हो....मला माझ्या या लाडक्या प्रवाश्यांच थोड वाईट सुद्धा वाटत कि वर्षातले काही दिवस माझ काही बिनसलं....मी वेळेवर नाही पोचू शकले तर माझी कीव कोणीच करत नाही. शिवाय आज कर्मभूमी पर्यंत येतात जातात....पण पासाच्या रांगेत उभे राहून मला दोन पैसे देताना मात्र चिडतात...भांडतात...सुखाने पास कधीच काढत नाही....
माझा तेव्हा पडलेला चेहरा पाहून ट्रेनलाच वाईट वाटल आणि लगेच म्हणाली....” अग वेडे , पण मी तक्रार अजिबात करत नाहीये....
तेव्हा मी तिला म्हंटल....कि अग हो ...पण तरी आम्ही रांगेत उभे राहतो तो तुझ्यावर राग म्हणून नाही....पास काढताना तुझ्यावर राग का असेल...?
अग राणी....पण तिकीट घर सुद्धा माझ घरच झाल कि....माझ्या घरात भांडण झालेली मला आवडतील का ? नाही ना.....मग ??? आणि कस आहे ...आम्ही निर्जीव म्हणून आम्ही कोणीच नाही असा समाज दूर होईल ना तेव्हा त्याचा फायदा तुम्हालाच होईल.
म्हणजे ?? काय बोलतेयस अग ? मी गोंधळून विचारल.
अग , तुमच काय होत माहितेय का ...तुम्ही आहे त्या गोष्टीला तसच्यातस स्वीकारत नाही. त्यात चुका काढत बसता...असच नाही ..तसच असत तर बर झाल असत वगेरे...पण अर्थात सगळे असे नसतात.असं काहींच्याच बाबतीत होत. पण तरी....आणि तुम्ही जर प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहिलं ना कि दिवसाची सुरुवात पण छान होते...आणि मुळात सकारात्मक च राहील पाहिजे की....
हो...म्हणजे आमचा राग तुझ्यावर निघणार नाही...म्हणून म्हणतेयस ना ??....मी खट्याळ स्वरात म्ह्टल.
आणि ती सुद्धा अगदी खळखळून हसू लागली....जस खूप वर्षांनी जुनी मैत्रीण भेटली आहे . आणि अनेक वर्षांच्या गप्पा राहिल्या आहेत....
आमच्या गप्पांना आता मस्त रंग चढला होता......
मी खूप उत्सुकतेने विचारलं...तुझ्यासाठी खास अशी आठवण कोणती आहे ??
अरे बापरे...खूपच कठीण आहे प्रश्न खरतर....अनेक आठवणी आहेत...म्हणजे जेव्हा माझा जन्म झाला...९ डबा, बारा डबा, आणि आता १५ डबा अशी माझी प्रगती झाली. नवीन गाड्या आल्या आहेत...नवीन पंखे...या सगळ्याच मस्त आठवणी आहेत.
पण खर सांगू....हे माझे लाडके प्रवासी जेव्हा माझ्यासोबत सण साजरे करतात, वाढदिवस म्हणा, भोंडले म्हणा, सकाळची आरती म्हणा...एखाद देवूळ लागल कि सगळे एकत्र हात जोडतात... या आठवणी जास्त छान असतात. माझेच प्रवासी मला कधीच एकट वाटू देत नाहीत.
ट्रेन मध्ये बोलता बोलता थांबली......
मला कळलंच नाही.अग काय झाल?
अग कशाला काय होईल...तुला उतरायचं आहे...या पुढे गाडी जात नाही. आल सीएसटी....
अरे...आल सुद्धा स्टेशन ? अग पण आपल्या बऱ्याच गप्पा राहिल्या आहेत. कारण खर सांगू...तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारख आहे.
अग....बस काय आता.....एवढी कठीण भाषा नाही समजत मला...
पण असो...भेटू पुन्हा...!!
मी उतरले...हसून तिला bye केल...खरतर ट्रेनला च....कोण काय म्हणेल..याचा विचार कारावासाच वाटला नाही....
जाता जाता एकच वाटल.....या निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत सकारात्मक अर्थ दडला आहे....हा अर्थ प्रत्येक ठिकाणी शोधूया...जपूया.

पुढे या नवीन ट्रेन मित्रीणीशी गप्पा होतीलच....

कविता कट्टा .......

   जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासोबत असते तेव्हा ती कितीही जवळची , महत्वाची आणि आपली असली तरी तीच महत्व ती गेल्यावर समजत....तिची प्रत्येक सवय...अगदी तीच हसण...बोलण ..चालण, स्वभाव सगळ्याच गोष्टी आठवायला लागतात. आणि त्या व्यक्तीच्या आठवणींच नवीन घर मनात करतात....

असच माझ्या आजी विषयी ती गेल्यानंतर तिच्यावर लिहिलेली कविता.....तिलाच समर्पित.....

         टू डीअर आजी उर्फ अजुली.............

दुःखाचा आवंढा गिळताना तुझी आठवण येते.....
आठवणीच्या दु:खला सामोरे जाताना तुझी आठवण येते......

आहे तुझा निर्मळ चेहरा जसाच्या तसा डोळ्यासमोर........
आहेस तू डोळ्यासमोर सदानकदा मानासोबत...........

जशी होतीस ...होतीस तू जगावेगळी .......
आठवणीच्या कोपऱ्यात असशील तू मनासारखी.......

सगळ्या गोष्टी आहेत आजही आठवणीच्या रुपात .....
पण हवी आहेस तू आम्हाला पूर्वीच्या रुपात.........

सुखाचे पारडे जड असूनही रमते मी दु:खात.......
सुखाचे पारडे जड नसूनही रमली होतीस तू संसारात......

अखंड अशीर्वादांसोबत आहेस तू आमच्याजवळ.......
आहेस तू आमच्याजवळ, राहशील तू आमच्याजवळ, नाही गेलीस तू देवाजवळ.......

देवाजवळ राहून पाहतेय्स आम्हाला , आमच्याजवळ राहून का नाही पाहिलस देवाला ? 
प्रश्नाच उत्तर हव आहे आजी ...नुसताच हसून वेळ नाही मारून न्यायाची..........


    आजच युग स्पर्धेच आहे....आणि आपल्याला आपल्या करियर मध्ये पुढे जायचं असेल तर आपली नेमकी आवड काय आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. आणि आपल्या आवडीच्या करियर मध्ये पुढे जाव. आज हे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतय. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण काही ठिकाणी हे चित्र बदलत नसेल त्यांच्यासाठी हे कविता आहे असं आपण म्हणू शकतो....
कोणाच्यातरी सांगण्यावर, आग्रहावर स्वतःच करियर करण आणि असमाधानी राहाण फारस योग्य नाही.....
तर स्वतःच ऐकल पाहिजेअसाच भाव घेऊन येतेय हे पुढची कविता........अर्थातच एक छोटासा प्रयत्न........

ऐक स्वतःच ...........


बाहेर ये या अघटीत कोशातून.....
मग आयुष्य जगशील तू स्वतःच्या नजरेतून.........

बाहेर ये या काळजीच्या छायेतून.....
कर विचार काळजीचा एका नव्या नजरेतून.........

निघून ये त्या चार चौकटीच्या बंधनातून.......
मगच पाहू शकशील त्या बंधनाला नव्या नजरेतून.......

स्वतःच्या इच्छेला मान देऊन , कर नव्या इच्छेचा प्रबंध.....
स्वतःच्या इच्छा मागे ठेवून पुरवू नकोस दुसऱ्याचा हट्ट ..........

आयुष्यतील धेय्याला मान , स्वतःच्या जीवनाचे रहस्य.......
मग जीवनाची नजरच मिळवून देईल तुला आयुष्याचे महत्व..........

कर सुरुवात आयुष्याला नव्या नजरेतून पाहण्याचा ....
मग जग पाहिलं तुला आदर्शांच्या नकाशात........
     
आपण लेखांमधून अर्थातच खूप प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो यात शंकाच नाही, पण कविता सुद्धा एक आपसूकच सहज व्यक्त करणार माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आज थोड कवितेमधून बोलण्याचा , व्यक्त होण्याचा एक छोटासा आणि पहिलाच प्रयत्न करतेय...........

                         प्रश्न

काही प्रश्न असे होते की , ते सुटता सुटले नाहीत .........
तर काही प्रश्न स्वतःला कधी प्रश्नच वाटले नाहीत......

काही प्रश्न बरच काही शिकवून गेले............
तर काही प्रश्न उत्तराच्या गोंधळात गोंधळून गेले..........

काही प्रश्न मनाला हवेहवेस वाटले..........
तर काही प्रश्न आठवून डोळ्यांच्या कडा ओलावून गेले........

 मैत्री 

   मैत्री या नात्याविषयी बऱ्याच लोकांनी खरतर प्रत्येकाने स्वतःच्या काही व्याख्या नक्कीच करून ठेवल्या असतील. कारण हे नातच तस जवळच असत. कुटुंबानंतर पाहिलं नात आठवत ते मैत्रीच.....मग ती मैत्री अगदी कोणाशीही असेल....लहान चिमुकल्यापासून ते अगदी आजी आजोबांपर्यंत ....मैत्री हे नातच अजब , अनोख  आहे....म्हणूनच म्हणतात ना “ मैत्री कारण सोप असत पण मैत्री टिकवण तितकच कठीण” . असच मैत्री या नात्यावर लिहिलेली ही छोटीशी कविता........... 

                                           मैत्री 


मैत्री म्हणजे नेमक काय असत ???
सगळ्यांच्याच बाबतीतल सगळच सेमअसत......
मैत्री म्हणजे प्रेम , जिव्हाळा..........
मैत्री म्हणजे आवडता रेशमी धागा..........
मैत्री म्हणजे थट्टा, मस्करी..........
मैत्री म्हणजे हवीहवीशी वाटणारी सहानुभूती..........
मैत्री म्हणजे एक कौतुकाची थाप............
मैत्री म्हणजे आत्मविश्वासाला दिलेली साथ.......
मैत्री म्हणजे हक्काने आलेला राग......
मैत्री म्हणजे समजून घेणारी साथ.........
मैत्री म्हणजे नेहमीच मदतीचा असलेला हात........
मैत्री म्हणजे आठवणीच्या चौकटीत राहून नात्याला केलेला सलाम !!!!                                                                                                    


                                   सामान्यातील असामान्यत्व

        या संपूर्ण विश्वात सामान्य माणसांची लोकसंख्याच जास्त आहे. म्हणजे कधी कधी वाटत की देवाला सुद्धा सामान्य माणस अधिक प्रिय असू शकतील. म्हणूनच त्याने त्याच्या सर्वलोकी संसारात सामन्य माणस अधिक बनवली आहेत. 
       मला तर या सामान्य माणसाच्या प्रवृतीचाच अभिमान वाटतो. आणि कधी कधी आश्चर्य सुद्धा वाटत ते त्यांच्या सहनशक्तीच. या सामान्य माणसाच वैशिष्ट्य पाहायला गेलो तर लगेच अगदी डोळ्यासमोर ठळक अश्या गोष्टी येत नाहीत पण एक दिवस असा अनुभवला की क्षणोक्षणी या सामन्यात्वाच कौतुक वाटत गेल. सामान्यामधले असामान्यत्व खऱ्याअर्थाने जाणवले. सामान्य माणूस हा खरतर नटाला हिरो मानत असतो पण नकळतपणे स्वतःच स्वत:च्या आयुष्यात स्वतःला सुद्धा एक  कर्तबगार हिरो मानायला विसरून जातो. आणि यात वेगळेपण हेच वाटते की त्याच्या हे लक्षात येत नाही किंवा लक्षात आलेलं असूनही तो बोलत नाही.
       सकाळी धावत्या घडाळ्याच्या काट्यासोबत तोही घराचा धावता निरोप घेतो. धावत्या ट्रेन मध्ये चढल्याचे , कसाबसा स्वतःचा जीव ट्रेनच्या दरवाज्यातून आतमध्ये आणल्याचे समाधान मानून दिवसाला सुरुवात करणारा " सामान्य माणूस " विचारांनी मात्र ग्रस्त . मग त्यात चिंता असतो वा  आशा. ट्रेनमधला प्रवास हा काहींसाठी नकोसा तर काहींसाठी स्वतःच्या ज्ञानात भर टाकणारा ,काहीना कधीच कोणी बोलू दिले नाहीये आणि हेच काय ते एकमेव गप्पा मारण्याचे ठिकाण असे समजून अगदी  आल्या  क्षणापासून जाईपर्यंत भरपूर गप्पा मारण्याची हीच ती जागा असा समजणारा खास प्रवासी वर्ग असतो तर काहींसाठी शांतपणे गाणी ऐकण्याचा नवीन ट्रेंड सुद्धा हा सामान्य माणूस लगेच स्वीकारतो. गर्दीतही पुस्तक वाचाणारे त्यात मग्न होऊन जाणारे तर कधी कधी सकाळच्या ताज्या बातम्यांचा पेपर तासाच्यातसा धरून घेऊन आलेले आपण पाहतो. यात वेगळी गोष्ट एवढीच जाणवते कि असाच त्यांचा दैनंदिन कार्यक्रम असतो पण ह्या सगळ्याचा कंटाळा असो वा नसो ते आनंदाने हसऱ्या चेहऱ्याने दिवसाची सुरुवात करतात. अगदी बातम्या कितीही कडू-गोड  असल्या तरी जीवनात संघर्ष हा आलाच हे अगदी सहजतेने पण जाणीवपूर्वक स्वीकारणारा हा सामान्य माणूस......
       ऑफीस मध्ये काम , मनापासून स्वीकारणाऱ्या जबाबदाऱ्या शिवाय त्यात

 आपसूकच ओढवून घेतलेली कामे . कारण अगदी दूरच्या मित्रालासुधा अनेकवेळा 
  
“ नाही ” हा शब्द उच्चारलेला नाही. पण तरी जबाबदाऱ्या स्वीकारताना कामाचा व्याप , 

काळजी हे सगळच मानवी स्वभावानुसार या गोष्टी आल्याच पण याच्या चेहऱ्यावर या 

काळजीच्या आठ्या आल्या तरी घरी परतल्यावर मुलांची निरागस हाक आणि चेहरे पाहून 

सगळ्या नकारात्मक गोष्टी पळून जातात. घरी येताना बायकोने सांगितलेल्या वस्तू 

आणण्याची आणि कितीही महाग असली तरी भाजीचा भाव  न करता आणि 

अप्रत्यक्षरित्या भाजीवालीला नफ्याचा डोंगरच चढवून देणारा हा सामान्य माणूस

 भाजीविक्रेत्यांकडून खूप दुवा मिळवून घरी येतो. पण  अपवाद हे असतातच.

     असो........पण एवढेच नाही तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणारा हा

 सामान्य माणूस काळाप्रमाणे स्वतःला बदलतो आहे. तंत्रज्ञानाशी मैत्री सुद्धा करतो आहे.
 
पण हे करताना त्याला त्याची माणुसकी जपायची आहे...टिकवायची आहे आणि या साठी
 
आणि एकूणच एकात्मतेसाठी त्याचे अविरत प्रयत्न चालू असतात ....

Tuesday, November 18, 2014

                             निवेदनावर बोलू काही.....

  निवेदन करता करता निवेदनावरच थोड बोलावस वाटल...लिहावस वाटल...ते आज तुम्हा सगळ्यांसोबत share करायला आवडेल.....निवेदनाचा थोडा बदलत चाललेला सकारात्मक ट्रेंड नेमका कसा ते पाहूया ........

 ‘’ आजकालची तरुण पिढी खरच खूप नशीबवान आहे. करियरच्या अनेक संधी त्यांना सहज उपलब्ध आहेत. आणि तरुणांसाठी प्रत्येक क्षेत्र आज विस्तारल आहे. आमच्या वेळी मात्र असं काहीही नव्हत.” अशी वयाने मोठ्या असलेल्या पिढीची नाराजी अनेक वेळा कानावर पडते. आर्ट्स , सायन्स , कोमेर्स या साचेबद्ध करियरकडे वळणारी तरुणमंडळी आता वेगवेगळी क्षेत्र करियर म्हणून पाहताना दिसते आहे. आज एखाद्या कलेकडे सुद्धा करियर म्हणून पहायचा ट्रेंड आहे. यामध्ये आज अनेक ठिकाणी गाण, डान्स ,अभिनय या कला करियर म्हणून केल्या जातातच पण यासोबतच निवेदन हि सुद्धा एक महत्वाची कला समजून त्यात करियर करणारी तरुण मंडळी आता दिसू लागली आहे.
   आज अनेक ठिकाणी गाण, डान्स , अभिनय अश्या स्पर्धांमधून या क्षेत्रात करियर करणाऱ्यांना स्टेज दिला जातो.पण निवेदन या क्षेत्राला सुद्धा तितकच महत्व येताना दिसून येत आहे. पूर्वी निवेदन या क्षेत्राकडे फुल टाईम करियर म्हणून पहायचा ट्रेंड असला तरी त्याची गती खूपच कमी होती. आता मात्र हेच चित्र झपाट्याने बदलताना दिसतय.  टीव्ही , रेडीओ या माध्यमांमुळे आता या क्षेत्रात ग्लामेर आल आहे. शिवाय पूर्वीपेक्षा इव्हेंट्स ची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आता ते पुर्वीसारख ठराविक गणपती, दिवाळी, पुस्तक प्रकाशन , गाण्याचे कार्यक्रम इथपर्यंत मर्यादित राहिली   नाही. त्यामुळे हे आता उपजीविकेच साधन होऊ शकत अशी खात्री तरुण पिढीला वाटू लागली आहे. या माध्यमांच्या प्रभावामुळे निवेदानासोबातच पार्श्वनिवेदन, वोईस ऑव्हेर्स, जाहिरातींमध्ये दिला जाणारा आवाज, वृत्तनिवेदन, लघुचित्रपट, डॉक्युमेंट्री, प्रोमो या क्षेत्राकडे आज तरुण मंडळी करियर करताना दिसत आहे.
    पूर्वी फक्त आशय महत्वाचा असायचा पण आता आशय आणि कार्यक्रमातला खुमासदारपणा या दोन्ही गोष्टी दिसून येतात. शिवाय निवेदनाच्या क्षेत्रातली आणखीन एक हटके गोष्ट म्हणजे त्याचे क्लास काढण्याचा नवीन ट्रेंड. शास्त्रोक्त निवेदन, माईकच तंत्रज्ञान, प्रेझेन्टेशन अश्या सगळ्या गोष्टी शिकण्याकडे सुद्धा त्यांचा कल दिसून येतो. यामुळे सादरीकरण आणि गायडन्स या दोन्ही गोष्टी यातून दिसून येतात. आता तरुण मंडळी निवेदनाच्या करियरला टेकनॉलोजीची विशेष जोड देताना दिसत आहेत. सोशल नेटवर्किंग साईट्स वर लगेच कार्यक्रमाचे फोटो, प्रोफाईल फोटो ठेवून, झालेल्या प्रत्येक कार्यक्रमाविषयीच स्टेटस टाकून एक प्रकारच मार्केटिंग करताना दिसत आहेत.

  आता अखीव रेखीव निवेदन मागे जाऊन त्यात निवेदकाची प्रयोगशीलता आणि मल्टीटास्किंग या गोष्टी  महत्वाच्या वाटू लागल्या आहेत.  ‘ आता या तरुण पिढी साठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. शिवाय कार्यक्रमाचे प्रकार सुद्धा तितक्याच झपाट्याने वाढत आहेत. हि पिढी त्यांच्या ग्रास्पिंग मुळे versatile दिसून येते. शिवाय ते टेक्नोसव्ही असल्यामुळे परफेक्शनजवळ पोचू शकतात.टीव्ही वर पूर्वीपेक्षा आता  निवेदक जास्त महत्वाची भूमिका बजावतो आहे. आता तो chanel चा आयडॉल बनत चालला आहे. आता तो फक्त निवेदक म्हणून नाही तर एक अभिनेता म्हणून शिवाय सगळी सूत्र सांभाळत कार्यक्रमाची एनर्जी कायम ठेवणारा महत्वाचा भाग बनत चालला आहे.