Thursday, October 12, 2017

उद्योग सफर भाग - ४ अमृता फुड्स- मिलिंद कुळकर्णी


उद्योग सफर भाग - ४ मध्ये सर्व वाचकांचं मनापासून स्वागत....


तुम्हाला आठवत असेल तर पूर्वीच्या काळी मधल्या वेळची  भूक भागवण्यासाठी प्रत्येक घरी लाडवाचा डबा हा असायचाच. पण काळानुसार पद्धती हळूहळू बदलू लागल्या. आता मात्र भूक लागली की, झटपट जे मिळेल ते खाण्याकडे मुलांचा कल अधिक असतो. यासाठी पिझा,बर्गर यांसारखे पदार्थ  लगेच एका फोनवर पार्सल करून घरी येऊ लागल्यामुळे लाडवाच्या डब्याची जागा या पार्सल होणाऱ्या पिझा, बर्गर्स यांनी घेतली. मात्र, 'पूर्वापार चालत आलेले पदार्थचं तब्येतीला उत्तम असतात'. असं अनेक  आहारतज्ञ नेहमी सांगत असतात. हाच विचार ज्यांनी तेवीस वर्षांपूर्वी केला आणि  आरोग्याला अतिशय उपयुक्त असणाऱ्या खाद्यसंस्कृतीची ज्यांनी त्यांच्या व्यवसायातून जपणूक केली ते म्हणजे  ठाण्यातील 'अमृता फुड्स' चे मालक श्री. मिलिंद कुळकर्णी आणि त्यांची पत्नी सौ.नीलिमा कुळकर्णी . 


आज आपण  उद्योग सफर भाग - ४  मध्ये  'अमृता फुडस्'चा तेवीस वर्षांचा प्रवास उलगडणार आहोत. त्यानिमित्ताने श्री.मिलिंद कुळकर्णी यांची घेतलेली मुलाखत.  

गायत्री- नमस्कार मिलिंद सर, उद्योग सफरमध्ये आपलं मनापासून स्वागत.

मिलिंद कुळकर्णी- धन्यवाद गायत्री!

गायत्री: मुलाखतीची सुरुवात याच प्रश्नाने करायला आवडेल की,  'अमृता फुडस्'ची सुरुवात कशी झाली? 

मिलिंद कुळकर्णी- ज्या वेळी आम्ही खाद्यपदार्थांचा व्यवसाय करायचा असं ठरवलं त्यावेळी 'लसूण चटणी' या पदार्थापासून सुरुवात करण्याचं ठरलं. अनेक प्रयोग करून जी चव आम्हाला आवडली ती आम्ही दुकानात प्रयोगाखातर विकण्यासाठी ठेवली. ज्यावेळी ग्राहकांचा  रिस्पाॅन्स पाॅझिटीव्ह आला त्यावेळी ते प्रमाण आम्ही नक्की केलं. आणि हळूहळू दुकानांची संख्या वाढवली. हा घरच्या-घरी केलेला लसूण चटणीचा प्रयोग फारच 'हिट' झाला. त्याची मागणी वाढतचं गेली. सुरुवातीला चटणीला कुठलाचं ब्रॅन्ड नव्हता. पण नंतर घरगुती पदार्थांना आम्ही ब्रॅन्डमध्ये रुपांतरित केलं. आणि तिथूनच ख-या अर्थाने 'अमृता फुडस्'ची सुरुवात झाली. आणि आजच्या जंक फूडच्या जमान्यात आपल्या महाराष्ट्रीयन पारंपारिक पदार्थांची संस्कृती  टिकवणं हा आमचा मुख्य उद्देश होता आणि अर्थात आहे ...पुढे सुद्धा असेल. 




गायत्री- अरे वा! सुरुवातीलाच  उद्देश  मनात पक्का होता आणि व्यवसायाचा श्रीगणेशा  या लसूण चटणीने केला शिवाय खास ओळख मिळवून दिली .. तुमच्या पत्नीचेही अभिनंदन!!

मिलिंद कुळकर्णी- हो! धन्यवाद !! लसूण चटणी हिट झाली. 

गायत्री- मग आता लसूण चटणीसोबत आणखी कोणकोणते पदार्थ 'अमृता फुडस्' मध्ये  तयार होतात? 

मिलिंद कुळकर्णी- लसूण चटणीसोबतच आता सोलापूरी शेंगदाणा चटणी, डिंक-मेथी-मूग-खजूर-बेसन-शेंगदाणा असे सहा प्रकारचे लाडू व त्यासोबत सुक्या खोब-याचा किस, शेंगदाणा कूट, उपवासाची भाजणी, थालीपीठ भाजणी, गोडा मसाला हे पदार्थ आता 'अमृता फुडस्' मध्ये बनवतात.













गायत्री- वा!.. आज अनेक पदार्थ 'अमृता फुड्स' मध्ये तयार होतात. पण सुरुवातीच्या काळात जम बसवताना काय मेहनत घ्यावी लागली?

मिलिंद कुळकर्णी- जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा  मुख्यत्वे पुण्यातील पदार्थांची स्पर्धा अधिक  होती. आजही काही प्रमाणात आहे. पण आमची नुकतीच सुरुवात असल्याने ती आम्हाला तेव्हा जास्त जाणवत होती. ठाण्यातल्या ब-याचशा दुकानांमध्ये पुण्यातून माल यायचा. तेव्हा आम्ही ठाण्यातल्या ठाण्यात माल पोहोचवायला सुरुवात केली. सुरुवातीला तेच सोयीस्कर होतं. कारण तेव्हा मी चार तासांच्या आत डिलिव्हरी करायचो. त्यामुळे 'अमृता फु़डस्' चा माल लवकर पोहोचायला लागला. पुण्यातून येणारा मला हा आठवड्यातून एकदाच यायचा. आणि मला असं वाटतं की, चवीत  कधीच कॉम्प्रमाईज न केल्यामुळे  आमच्या मालाची अधिकाधिक मागणी वाढायला सुरुवात झाली.






गायत्री- तुम्ही आता उभा केलेला डोलारा पाहून तेव्हा तुम्ही घेतलेल्या मेहनतीची पूर्ण कल्पना येतेय. पण आजही  असे कोणते अडथळे आहेत ज्यावर आजही मेहनत घ्यावी लागतेय?

मिलिंद कुळकर्णी- हो नक्कीच आहेत. खाद्यपदार्थांच्या व्यवसायातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे 
लेबर प्रॉब्लेम. मनुष्यबळाशिवाय काम करणं कठीण असतं. त्यामुळे कुणी गैरहजर असो वा नसो, आपल्याला सगळी कामं करण्याची तयारी ठेवावी लागते. शिवाय स्पर्धाही आहेच. उत्पादनांची चव टिकवणं, हे एक जबाबदारीचं काम आहे. आणि त्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते. आम्ही उत्तम प्रतीचे (घटक पदार्थ) इनग्रिडियंटस् वापरतो. व मुख्य म्हणजे प्रिझर्व्हेटिव्हज ( Preservatives) अजिबात वापरत नाही, जी शरीराला हानिकारक असतात. 

गायत्री- घरातून सुरु झालेला व्यवसाय आणि मग  स्वतःची कमर्शिअल जागा ( कमर्शिअल जागेतील कारखाना)  हा प्रवास फारच कौतुकास्पद आणि अर्थात प्रेरणादायी आहे. पण या प्रवासात असे कोणकोणते टप्पे आले, जे व्यवसाय वाढीसाठी फायदेशीर ठरले?

मिलिंद कुळकर्णी- सुरुवातीला घरात आणि नंतर भाड्याच्या जागेत होतो व त्यानंतर स्वतःची कमर्शिअल जागा घेतली. टप्पे म्हणशील तर जसजशी मागणी वाढत गेली तसतसे जास्तीत-जास्त उत्पादन होण्यासाठी  त्यापद्धतीची यंत्रसामग्री विकत घेतली. त्यामुळे तयार होऊन बाहेर पडणा-या मालाचे प्रमाणदेखील वाढले आहे. पण या सगळ्यातली गुंतवणूक आम्ही टप्प्याटप्प्याने करत गेलो. मशीन्समुळे पदार्थांचा दर्जा सारखा ठेवता येतो. जे हातांनी करताना कठीण होतं. पॅकिंग आम्ही खूप खर्चिक केलं नाही, कारण अखेर त्याची किंमत आमच्या ग्राहकांनाच द्यावी लागते. 

गायत्री-  अरे वा! हे तुमच्या व्यवसायातील टप्पे नव्या उद्योजकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील यात काहीच शंका नाही. 

'अमृता फुडस्' चे पदार्थ आज कुठे-कुठे उपलब्ध आहेत?

मिलिंद कुळकर्णी- ठाण्यामध्ये तर 'अमृता फुडस्' सुमारे दोनशे  दुकानांमध्ये उपलब्ध आहे. शिवाय पार्ले, अंधेरी, मुलुंड, चेंबुर, डोंबिवली  या सर्व ठिकाणी 'अमृता फुडस्' चे पदार्थ  पोहोचतात. आणि सांगायला नक्कीच आवडेल की, आमच्याकडे फुड प्रिझर्वेशन अजिबात नाही. सगळा माल फ्रेश असतो.

गायत्री- अन्नपदार्थ  तयार करायचे  म्हणजे  त्यासाठी आवश्यक  काळजी घेणंही आलंच. 'अमृता फुडस्' कडून ही काळजी कशी घेतली जाते?

मिलिंद कुळकर्णी- आम्ही स्वच्छतेच्या बाबतीत सतर्क असतो. या सगळ्या बाबतीत माझी बायको स्वतः जातीने लक्ष घालते. काही नियम आहेत, जे कर्मचारी वर्गाला पाळणं बंधनकारक असतं. 
उदा.- डोक्यावर  हेअर कॅप घालणं, काम सुरू करण्यापूर्वी हात धुवून घेणं. शिवाय रात्री घासून ठेवलेल्या भांड्यांवर धुळ साचू शकते. त्यामुळे दुस-या दिवशी काम सुरू करण्याअगोदर  ती भांडी पुन्हा धुतली जातात.ही सगळी काळजी आम्ही कटाक्षाने घेत असतो. यामध्ये कधीही शाॅर्टकट नसतो. 







गायत्री : मागे वळून पाहताना कोणत्या गोष्टीचं अधिक समाधान वाटतं?

मिलिंद कुळकर्णी: व्यवसाय करताना एक प्रकारची समाजसेवाही होते याचं समाधान अधिक वाटतं.आमचे तीन डिस्ट्रीब्युटर व कामगार स्त्रिया  यांच्या संसाराला 'अमृता फुडस्' मुळे मदत होते. कामगारांना कधी आर्थिक प्रश्न उद्भवला तर ते आमच्या कुटुंबातीलच आहेत असे समजूनच आम्ही त्यांना मदत करतो. म्हणजे स्वार्थाबरोबर परमार्थ सुद्धा साधला जातो.

गायत्री: आज या सगळ्या प्रवासातून आम्हाला तुमचे अनुभव ऐकता आले...आणि  त्यातून  शिकताही आलं. 

'माझी लेखणी' तर्फे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !! 
मिलिंद कुळकर्णी - धन्यवाद !! 



Contact No:
Amruta Foods 
Factory No- 21721225
Mob no- 9869401762












No comments:

Post a Comment