Thursday, November 20, 2014

                        एलीझाबेथ एकादशी........


   
   मागच्याच आठवड्यात चित्रपट पाहून आले. नेहमी असं होत बघा...चित्रपट आपल्याला आवडला की तो कायम डोक्यात बसतो. मग त्यात आपल्याला आवडलेली वाक्य..संवाद. त्यातला एखादा प्रसंग...वगेरे वगैरे....पण असच या चित्रपटात मला मनापासून आवडलेल्या काही गोष्टी शेअर करण्याच हेच उत्तम मध्यम आहे. याला मी केलेली समीक्षा म्हणता येणार नाही. कारण त्यासाठी एका विषयातलं तज्ञ असाव लागत....अजून तरी तज्ञ व्हयला वेळ आहे. प्रयत्न चालू आहेत. पण सध्यापुरत....मला आवडलेला चित्रपट या विचारानिशी माझी लेखणी मी सुरु करतेय.....

    नुकताच पाहिलेला एक अप्रतिम चित्रपट. लहानमुलांच भावविश्व अगदी सहजतेने आपल्या समोर येत आणि आपलसं होऊन जात. चित्रपट सुरु झाल्यापासूनच अगदी सुरुवातीच्या नावांपासून आणि त्यात असलेल ग्राफिक्स शिवाय ती अनोखी आणि आगळीवेगळी सायकल लगेचच लक्ष वेधून घेते. “ दगड दगड दगड.....हे मुलांच्या आवाजातलं गाण ऐकायला नक्कीच मजा येते.
    चित्रपटात मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे त्यात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत दाखवलेला साधेपणा. आर्थिक परिस्थिती बेताची असताना सुद्धा, काळजी असूनसुद्धा  चेहऱ्यावर मात्र  हास्य.किंवा कुठेही फारशी सतत जाणवणारी चिंता नाही. जरी ती असली तरी खूप विचारकरून धडपड करणार कुटुंब.  मुलांच्या शिक्षणावर असलेला भर. त्याचसोबत  मुलांना परिस्थितीची असलेली जाण. या गोष्टी मला खूप सकारात्मक वाटल्या.
    पंढरपुर गाव , पंढरीची वारी पाहिल्यावर जरी आपण कधी गेलो नसलो तर आपण या चित्रपटाच्या माध्यमातून पंढरपूर फिरून आलो असाच काहीसा भास होतो. इतक  वास्तववादी चित्रण या चित्रपट केल आहे.
    लहान मुलांना त्यांची स्वतःची एखादी गोष्ट असेल तर ती गोष्ट अगदी मनापासून , आणि जीवापाड जपताना दिसतात. तशीच या चित्रपटातली सायकल त्यांना जीवापेक्षा जास्त महत्वाची असते. आणि ती कायम आपल्यासोबतच असावी या साठी तीच केलेलं नामकरण अर्थातच “ एलीझाबेद ”. कारण या शब्दामध्ये अनेक वर्ष टिकण्याची ताकद आहे असा मुलांचा निरागस समज. या निरागसतेमध्ये लक्षात राहीलं ते भावा- बहिणीच नात. वारीमध्ये आईला न सांगता  टाकलेलं बांगड्यांच छोटस दुकान . पण आईलाच पैशाची थोडीफार मदत व्हावी ही इच्छा . पण आईचा विरोध असताना दुकान टाकण्याच केलेलं धाडस आणि तिला कळू नये म्हणून या चिमुकल्या बहिण भावंडांची एकमेकांना असलेली अगदी यथायोग्य साथ कौतुकास्पद वाटते. त्यात सगळ्यात जास्त भावलेला प्रसंग म्हणजे जेव्हा तो वडापाव विकत घेतो तेव्हा स्वतः न घेता बहिणीला आधी विचारतो . आणि दुसरा म्हणजे काही कारणांमुळे वारीत झालेल्या भांडणामुळे , मारामारीमुळे त्याचं छोटस दुकान विस्कटून जात... आणि एकूणच नुकसान होत. तेव्हा लहान बहिणीला लागत , रक्त येत....ती रडायला लागते. त्यावेळी सगळ्याच लहान मुलांची झालेली धावपळ. आणि त्यात तो महागातला बांगड्यांचा बॉक्स शोधण्याची त्यांना त्यावेळी वाटलेली गरज दिसून येते. पण तरी इतके लहान असून सुद्धा कोणीही रडत नाही. आता काय होईल म्हणून घाबरून बसत नाही. प्रोब्लेम वर सोल्युशन शोधायला सगळेच तयार असतात. त्या गोंधळात सुद्धा त्या छोट्या भावाची बहिणीविषयी असलेली काळजी दिसून येते. “लागल आहे तर येऊ नकोस आम्ही जाऊन येतो.” असे काहीसे त्याचे काळजीचे शब्द पण तरी बहिणीवर या प्रसंगाचा अजिबात तो राग वगेरे काढताना दिसत नाही. आहे त्या प्रसंगाला सामोरे जातो.
    परेश मोकाशी याचं अप्रतिम दिग्दर्शन आणि मधुगंधा कुलकर्णी याचं लिखाण यामुळे चित्रपटाला एक वेगळाच बाज आला आहे. खूप कमी पण  नेमक्या  शब्दांमधून पोचणारा हा चित्रपट आहे. शिवाय प्रत्येक कलाकाराने हावभावामधून तर हा विषय...त्याचा गाभा पोह्चावालाच आहे......

जाता जाता इतकच...चित्रपट जरूर बघा......न्यूटनने सांगितलेलं सायन्स एका वेगळ्याच शैलीत ऐकण्यासाठी तर नक्कीच पाहावा असा चित्रपट आहे. 

No comments:

Post a Comment