रविवार....
रविवारचा दिवस होता. म्हणजे
अर्थातच अगदी संपूर्ण मानव जातीचा आवडीचा दिवस म्हणायला हरकत नाही. पण या जगतावर
असं एक कुटुंब होतं ज्यांना गेल्या सहा महिन्यापासून रविवार नकोसा वाटायला लागला
होता. कारण तसं हलक फुलकच होतं पण म्हणतात ना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की
त्रास हा होणारच आहे. त्याचप्रमाणे याही कुटुंबात नेमक तेच घडायला लागलं होतं. महाजन
कुटुंबात दर रविवारी सर्कशीतल्या खेळाप्रमाणे त्याच तिकिटावर तेच खेळ चालू होते.
रविवारची सकाळ होते ना होते जोशी काका त्यांच्या LIC च्या पोलिसिज घेऊन आलेच म्हणजे
समजायचं कि आज रविवार आहे. वय वर्ष ७५ . पण तरी प्रत्येक गोष्टीतला उत्साह वीस
वर्षाच्या तरूणाइतका. मनाने तरुण असले तरीसुद्धा शरीराने साथ देणं आता कमी होत
चाललेलं. पण त्यांच्या मनाने कधीच हे मान्य केल नाही. ‘अहो आजोबा, एवढी धावपळ करू
नका आता. शरीर थकतं तुमचं’ असा उच्चार जरी केला तरी चालायचं नाही त्यांना. कोणा
अनोळखी व्यक्तीने बायकोसमोर अपमान केला तर कशी चिडचिड होऊ शकते तसे काहीसे
चिडायचे, रागवायचे. त्यामुळे त्यांच्या प्रकृती विषयी कितीही काळजी वाटली तरी “मौनं
सदा सुखी” अशी अवस्था प्रत्येकाची व्हायची. ते असो..पण घोड अडायचं ते फक्त दर
रविवारी.
महाजन कुटुंबातले आजी-आजोबा यांचे जोशी
आजोबा हे जुने मित्र. कॉलेजमध्ये असल्यापासूनची त्यांची ओळख. नंतर अनेक वर्ष सरली
काहीच संपर्क नव्हता. थेट त्यांची भेट झाली ते मुंबई शहरातच. सकाळी बागेत सगळ्या आजी आजोबांचा हास्य क्लब असतो त्याच ठिकाणी. मग
काय..... गप्पा रंगत गेल्या आणि जुन्या
सगळ्या गावाकडच्या आठवणीना उजाळा मिळत गेला. मग काय रोज भेटीगाठी, मजा, मस्ती.
जोशी आजोबांना नवीन शहरात स्थिर होण्यासाठी त्यामुळेच वेळ लागला नाही. वर्षभर अशाच
भेटी होत होत्या. महाजन आजोबांना जोशी आजोबांचं नेहमीच कौतुक वाटायचं. वयाची
सत्तरी उलटून गेली तरी घरोघरी जाऊन नवीन शहराशी जुळवून घेऊन LIC च्या पोलिसिजच काम
सतत करत असयाचे. मुलगा , मुलगी सुस्थितीत आहेत तरी घरी सगळ चांगल चालू आहे.बायको,
मुलं,सुना, नातवंड सगळ्यांच नेहमी कौतुक
तर करत असतो मग इतक्या वयात सुद्धा हा काम करायचा कोणता उत्साह देव जाणे !! असं
त्यांच्या मनात नेहमीच यायचं पण त्याच उत्तर शोधायचा अट्टहास कधीच त्यांनी केला
नाही. त्यांनी कधीच अट्टहास केला नाही पण जोशी आजोबा दर रविवारी त्यांच्या या मित्राच्या घरी
येण्याचा अट्टहास त्यांनी सहा महिने सोडला
नव्हता. सुरुवातीला कोणालाच काहीच वाटायचं नाही. पण हळू हळू महाजन आजोबांच्या घरी जोशी आजोबांच्या दर रविवारी सकाळी सकाळी येण्यामुळे चिडचिड सुरु
झाली होती. त्यावरून जरा वादावादी होऊ लागली होती. सुनेचं म्हणण असायचं कि एकच रविवार
मिळतो त्यात त्यांच्या येण्यामुळे घर काहीच आवरून होत नाही. १२ वी मध्ये शिकणारा
ओजस आणि ९ मध्ये शिकणारी आर्या सुद्धा कंटाळले होते. आजी ला कोणाची बाजू घ्यावी
हेच कधी कळायचं नाही. मुलाला कधी काही विशेष फरक पडायचा नाही. पण काही जरी असलं
तरी सतत सहा महिने दर रविवारी त्याचं येण, गप्पा मारण, पेपर नाश्ता वगेरे करून दोन
–तीन तासांनी घरी जाणं या रविवारच्या दिनचर्येचा खरच सगळ्यांना फार कंटाळा आला
होता.
एकदा मात्र ओजस आणि आर्या या दोन भावंडानी
ठरवलं कि एका रविवारी आपणच त्यांच्या घरी जाऊया . त्यांची सवय मोडण्यासाठी या
दोघांनी बराच विचार करून ठेवला होता. घरी याची कोणालाच कल्पना नाही. दोघ सकाळी
खेळायला जातो म्हणून लवकरच गेले. त्यांची पूर्व तयारी झाली होतीच त्यामुळे ते कुठे
राहतात याचाही शोध घेऊन झाला होता. पोलिसीचे काही पेपर द्यायचे हे निम्मित करून
दोघ त्यांच्या सोसायटीपाशी पोचले. बेल वाजवली . जोशी काकांनी दर उघडलं. आर्या आणि
ओजस ला पाहून त्यांना इतका आनंद झाला कि कितीतरी शतकं त्यांच्या घरी कोणीच आल
नाहीये. त्यांचा आनंद पाहून दोघांना बर वाटलं पण जरा आश्चर्य सुद्धा वाटलं. जोशी
काकांनी त्यांना आतमध्ये बोलावलं. त्यांच्या साठी चहा केला...आग्रहाने पोहे वाढले.
सगळ आनंदाने आणि नेहमीच्याच उत्साहाने. पण दोन्ही मुलांच्या मनात आणि चेहऱ्यावर
प्रश्न घडाळ्याच्या काट्याप्रमाणे हळू हळू वाढायला लागले होते. जोशी काका एकटेच
कसे ??? आज तर रविवार आहे ना ? मग त्यांच्या घरी त्यांची बायको, मुलगा , सून
त्यांची नात हे सगळे कुठे गेले ? ते नेहमीच तर त्यांच्या विषयी बोलायचे. मग घर इतक
रिकाम कस ??? काहीच कळत नव्हत. त्या दोघांना न बोलता एकमेकांना पडलेले सारखे प्रश्न
सतत भेडसावत होते. पोहे खाण्याची क्रिया त्यांच्या कडून होत होती. पण प्रत्येक
घासासोबत एक एक प्रश्न मनात येत होता. शेवटी न राहवून ओजस ने आजोबांना विचारलंच....आजोबा
तुमच्या घरातले सगळेजणं कुठे आहेत ? कोणीच दिसत नाहीयेत ? बाहेर गेलेत का कुठे ?
आजोबा म्हणाले नाही रे
...सगळे इथेच आहेत कि ...
आर्या ने जरा घाबरून
विचारलं...इथे म्हणजे?? आम्हाला का दिसत नाहीयेत.
अग वेडाबाई ...इथे म्हणजे माझ्या
मनात आहेत की संपूर्ण आयुष्य....
म्हणजे ?????? आर्या आणि ओजस
दोघांनी काहीच न कळल्यागत विचारलं.
आजोबा सांगू लागले....माझं
लग्नच झाल नाहीये. म्हणजे समाजासाठी तरी.
म्हणजे काय आजोबा ?? आम्हाला
काहीच कळत नाहीये.
जरा अवघड आहे
समजायला...तुम्ही लहान आहात. राहूदेत. आजोबा म्हणाले.
नाही आजोबा..आम्ही इतके पण
लहान नाहीयोत. आम्हाला सगळ खर खर सांगा..प्लीज. असं अर्धवट सांगू नका. आर्या
लगबगीन म्हणाली.
तिच्या चेहऱ्यावरची
अस्वस्थता पाहून आजोबांनी सत्य सांगायला सुरुवात केली.
कॉलेजमध्ये असताना माझं एका
मुलीवर प्रेम होत. आत्तासारखे मोबाईल नव्हते...संपर्काची माध्यमच नव्हती. पण तरी
सुद्धा पाहताक्षणी जन्मोजन्मीचं नात असल्यासारखं भासलं होत. तेव्हाच काळ मोठा
विचित्र होता. मुलींशी बोलायचं नाही. त्यात प्रेम विवाह म्हणजे फारच मोठी गोष्ट.
पण तरी नि:शब्दात सुद्धा प्रेम असू शकत अशीच आमची प्रेम कहाणी पूर्ण कॉलेजमध्ये
असताना होती. काहीच बोललो नाही. पण नजरेतून सगळच कळायचं. छान होते ते दिवस. कॉलेजचा
शेवटचा दिवस. नंतर परत कधी भेट होईल माहित नाही. पण लग्नासाठी मागणी घालणार हे
मनात पक्क माहित होत. पण लगेच तो विषय काढायचा नव्हता. पण तिला हा निरोप सुद्धा द्यायचा होता. जरा नोकरी वगेरे
लागली कि तिला रीतसर मागणी घालू. असाच विचार घेऊन तिला भेटलो. ती सुद्धा याच
विचाराने आली असावी बहुदा. त्यादिवशी सगळेच सगळ्यांशी बोलत होते त्यामुळे आमचं जरा
जास्त वेळ बोलण फारस दिसून आलं नाही. दोघांनी एकमेकांचा होकार न विचारता
स्वीकारल्यागत आमच बोलण झाल होत. म्हणजे इतकी वर्ष नजरेतून होणारा आणि प्रत्यक्ष
होणारा संवाद यात तितकाच खरेपणा होता. हे दोघांनाही जाणवलं होत. मला लगेचच नोकरी
लागली. आमच्या घराची परिस्तिथी तशी चांगलीच होती. त्यामुळे नाही म्हणण्यासारखे
काहीच नव्हते. नोकरी लागल्यानंतर आमच्या भेटीगाठी झाल्या...आयुष्याची घडी एका
अतिशय योग्य आणि मृदू मनाच्या व्यक्तीसोबत बसणार आहे याची मनोमन जाणीव होत होती.
मनात एक वेगळ समाधान असायचं. आमचे विचार जुळायचे. सगळ अगदी छान जमून यायला लागलं
होत. सुंदर स्वप्न रंगवायला आमच्याही नकळत आम्हीच सुरुवात केली होती. एकदा अचानक
तिने येऊन सांगितलं तिच्या घरी तिच्या लग्नासाठी स्थळ पाहणार आहेत. काही स्थळ आली
सुद्धा आहेत. त्यावेळी मनात काहीच भीती नव्हती. कारण कोणत्याही गोष्टीमुळे हे लग्न
होणार नाही असं स्वप्नात सुद्धा वाटल नव्हत. त्यामुळे मनाने खूप उभारी दिली होती. एका
रविवारी घरी जाऊन तिच्या वडिलांसमोर रीतसर तिला मागणी
घातली. तिच्या घरी मी सगळ्यांनाच आवडलो. माझ्याही घरी मुलगी पसंत
झाली. त्यामुळे लग्न होणार हे तर अगदी निश्चित झालं. प्रेम विवाह दोन्ही घरातून
सहज स्वीकारला गेला. आम्ही दोघं खूप खुश होतो. आता साखरपुडा झाल्यावरच भेटा असा
घरच्यांचा निरोप आम्ही पाळायला सुरुवात केली. साखरपुड्याच्या खरेदीसाठी भेटलो ...खरेदी
झाली तिला घरी सोडून घरी यायला निघालो. ती सुद्धा सुखरूप घरी पोहोचली होती. पण
नशिबाचा खेळच मोठा विचित्र असतो. घरी पोहोचल्यानंतर तिच्या आईने तिला बाजारातून
भाजी आणायला सांगितलं . त्यामुळे लगेचच ती जवळच्या दुकानात भाजी आणायला गेली,
तेवढ्या १५ मिनिटात अपघातात तिचा मृत्यू झाला. ती एकत्र अशी शेवटची संध्याकाळ.
सगळी स्वप्न अपूर्ण राहिली. ती अर्धवट साथ सोडून निघून गेली. पण मी मात्र आम्ही
रंगवलेला तोच संसार आजपर्यंत जगतो आहे. तिच्याच सोबत. आमची मुल मात्र स्वप्नातली
आहेत खरी. पण कल्पनेतल्या संसारावर रोज जगतोय मी. मला दुखः नाही त्याच...कारण माझी
होणारी बायको मला नाही अखय्या जगाला सोडून गेली होती. मनात आमची प्रेमाची नाळ घट्ट होती. तिची जागा मी
कधीच कोणाला दिली नाही. आमच्या प्रेमाचा अपमान झाला असता . जितके दिवस आम्ही एकत्र
होतो तितके दिवस होतो. आयुष्यभर एकत्र राहण्याचं वाचन आम्ही न बोलताच दिल होत
एकमेकांना. तेच आयुष्यभर मनापासून सांभाळत आलोय. तिच्याच साथीने.
हे सगळ ऐकून आर्या आणि ओजस
थक्क झाले. त्यांना काय बोलावे सुचेना. ज्यांच्या रविवारच्या सतत येण्यावर इतकी
चिडचिड केली, ज्यांचा सतत रागराग केला ती व्यक्ती नेमकी अशी आहे ...तिचं आयुष्य ,
प्रेम, इतकं आदर्श आहे याची जराही कल्पना नव्हती.
ते दोघ काही बोलायच्या आधीच
आजोबा म्हणाले...पोरांनो, मला माफ करा. तुमच्या अनेक रविवारची झोप मी उडवली. मला
कल्पना आहे याची.
आता नाही येणारे मी तुमच्या
घरी..बायकोच ओरडली आहे मला स्वप्नात..काय सारखे सारखे त्यांच्या घरी जाता
म्हणून....आजोबा हसत हसत बोलत होते. गंभीर झालेलं वातावरण बदलण्यासाठी.
पण खर सांगू पोरांनो, कधी कधी
घर खायला उठायचं रे...
तुम्ही सगळे मला माझे
वाटता...म्हणून इतक्या हक्काने यायचो तुमच्याकडे.
आजोबा...तुम्ही फक्त रविवार
काय...अगदी रोज या ..आमची काही हरकत नाही. आम्हाला हे काहीच माहित नाही. खरतर
आजोबांनासुद्धा याची कल्पना नाहीये. ओजस म्हणाला...
नाही रे....मी आता उद्या
बंगलोर ला जाणारे आणि ते पण विमान प्रवास करणारे. म्हणून तर आज त्या सगळ्या तयारीत
होतो.
आजोबा ...कुठे जाताय तुम्ही
? दोघांनी अशा पद्धतीने विचारलं कि आता आजोबा फक्त त्यांची जबाबदारी आहे.
अरे ...माझ्या बायकोच स्वप्न होत. विमानप्रवास
करायचं. तो करणारे आता...जरा आता कुठे पैसे जमलेत...म्हंटल करून येतो.
त्यांच्या आनंदी चेहऱ्याकडे
पाहून आर्या आणि ओजस सुद्धा हसले...त्यांच्या डोळ्यात आता फक्त त्यांच्या विषयी
काळजी होती..आणि भरपूर प्रेम.
दोघंही उठले. त्यांना नमस्कार
केला.
आजोबा....ज्या व्यक्तीसोबत
तुमचं लग्न होऊच शकल नाही त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगलात....तुम्ही आमच्या पिढी
समोर खऱ्या प्रेमाचा एक आदर्श घालून दिलाय....
आजोबा...तुम्ही ग्रेट
आहात.....
happy journey
आजोबा....काळजी घ्या..सावकाश जा...
आम्ही वाट पाहतोय
तुमची....पुढच्या रविवारी....
तिघांनी एकमेकांकडे
पाहिलं...ज्याला त्याला उमजलेल्या , भावलेल्या भावनांनी एकमेकांचा निरोप
घेतला....पुन्हा रविवारी भेटण्यासाठी....
Digital Minds
गायत्री कशेळकर.
content writer and developer
Gayatri, good try, abhinandan!
ReplyDelete... vijay
thnkuu kaka...
DeleteHello, nice attempt you gave made! Keep it up!:-)
ReplyDeleteHello, nice attempt you gave made! Keep it up!:-)
ReplyDeletethnks..
DeleteGood one
ReplyDeleteGood one
ReplyDeletedada.......thnkuuu
DeleteSundar lekh, kharach apratim.
ReplyDeletethnkuuu
Deleteव्वा छानच लेख
ReplyDeletethnkuuu....
Delete