संगीत संशयकल्लोळ मधील रेवती....
डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक
शहरातला जन्म. वडील पेशाने चित्रकार आणि आई शिक्षक. त्यामुळे कलेचा वारसा आणि ती
कला जपण्यासाठी घ्यायची मेहनत आणि सातत्य याचं बाळकडू घरातूनच मिळालेलं. आणि याच
संस्कारांशी प्रामाणिक राहून मेहनत घेऊन जिने
संगीत, नृत्य आणि आता अभिनय शिवाय शैक्षणिक करियर या सगळ्याचा उत्तम मेळ साधत थेट संगीत नाटकाचा मंच गाठला ती
म्हणजे अर्थातच डोंबिवलीची उमा पळसुळेदेसाई. आणि आता तिची खास ओळख म्हणजे संगीत
संशयकल्लोळ या नाटकात रेवतीची भूमिका करणारी आणि याच नाटकासाठी अखिल भारतीय
नाट्यपरिषदेचा सर्वोत्कृष्ट नाट्य अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी उमा पळसुळेदेसाई.
उमाचा
संगीताचा प्रवास वयाच्या सातव्या वर्षीपासूनच सुरु झाला. सुरुवातीला पं. नारायणबुवा जोशी आणि त्यांनतर
पं. मधुकर जोशी यांच्याकडे तिने संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. आणि विशेष
म्हणजे संगीताची कोणतीही परीक्षा न देता फक्त गुरु- शिष्य परंपरेने हे संगीताचे
तिचे शिक्षण चालू आहे. संगीतासोबतच नृत्यातही तिची विशेष आवड असल्यामुळे कथक नृत्यांगना
ज्योती शिधये यांच्याकडे तिने कथकचे प्रशिक्षण घेतले. आणि भारती विद्यापीठातून ती
कथक विशारद आहे. आता गांधर्व महाविद्यालयातून विशारद करण्यासाठी तिची तयारी सुरु
आहे.
लहानपणापासूनच गाण आणि नृत्य या दोन्ही
कलांचा सराव, रियाज, स्पर्धा, कार्यक्रम असा एकूणच मेळ साधत तिने तिच्या शैक्षणिक
अभ्यासाकडे सुद्धा कधी दुर्लक्ष केले नाही. विद्यानिकेत शाळा तर कॉलेजची चार वर्ष
रुईया मधून कला शाखा आणि शेवटच वर्ष पेंढारकर महाविद्यालातून तिने पूर्ण केलं. दहावीनंतर
मेडिकल मध्ये करियरचा विचार करत असतना उमाला वाचपेई सरांचा फोन आला आणि तिने कला
शाखेत करियर कराव असा त्यांनी सल्ला दिला. त्या नंतर तिने कला शाखेत प्रवेश
घेण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांनतर तिने तिच्या सगळ्या कलांकडे आणखीन
प्रामाणिकपणे लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि तोच तिच्या आयुष्यातला टर्निग पोइंट
ठरला असे म्हणता येईल. त्यानंतर उमाने मानसशास्त्र विषयात पदवी घेऊन ती पुढील
शिक्षण आता क्लिनिकल सायकॉलोजी या विषयात
घेणार आहे. शाळा – कॉलेजांमध्ये असल्यापासूनच अभ्यास, गाण्याचा रियाज, नृत्याचा
सराव, परीक्षा शिवाय संगीत-नृत्याचे कार्यक्रम, स्पर्धा या सगळ्या गोष्टींना समान
महत्त्व देत त्यात सातत्य कायम ठेवलं. पूर्वी ज्या स्पर्धांना ती स्पर्धक म्हणून
जायची आज ती त्याच स्पर्धांना आता परीक्षक म्हणून जाते. संगीत संशयकल्लोळ या
नाटकासाठी तिची झालेली निवड ही काही तासात झालेली निवड जरी असली तरी सुद्धा
इथपर्यंत येण्याचा प्रवास हा दहा वर्षांच्या मेहनतीचा होता.
गुरु शिष्य परंपरेने गाण शिकत असताना नवीन
काहीतरी शिकण्याचा उमाचा मानस कायम होता. यामध्ये तिला रामदास कामत, रजनी जोशी,
अर्चना कान्ह्रेरे, श्रीकांत दादरकर, व शुभदा दादरकर अशा दिग्गज मंडळींचं
मार्गदर्शन लाभलं. त्यातून खऱ्या अर्थाने
तिचा नाट्यसंगीताचा प्रवास सुरु झाला. तिने
नाटयसंगीताचा डिप्लोमा पूर्ण करून त्यातही प्रथम क्रमांक मिळवला. आणि त्यावेळी ते
बक्षीस तिला दिग्गज कलाकार प्रशांत दामले यांच्या हस्ते मिळालं. नृत्य आणि
संगीतासोबतच तिला अभिनय करण्याची इच्छा आणि एक मनातून आत्मविश्वास होता.
त्यामुळे अभिनयाची सुरुवात तिहाई निर्मित
गेंडा या नाटकापासून झाली. तिहाईचे संचालक मिलिंद अधिकारी यांच्याकडून तिने
अभिनयाचे धडे घेतले. आणि त्यातील तिची प्रगती पाहून आणि रीतसर ऑडीशन देऊन तिला संगीत संशयकल्लोळ या
नाटकात रेवतीची भूमिका करण्याची संधी मिळाली.
आजही इतक्या लहान वयात इतकी मोठी संधी
मिळूनसुद्धा उमाचा सराव, रियाज, खाण्या-पिण्याची पथ्य तितक्याच ताकदीने सुरु आहेत. शिवाय लहान वयात यश
कमावले असूनसुद्धा तिचे पाय मात्र जमिनीवर आहेत. आणि याच तिच्या गुणांमुळे ती अशा
अनेक संधींच सोनं करेल यात काहीच शंका नाही.
आरजे गायत्री कशेळकर.
No comments:
Post a Comment