Thursday, November 22, 2018

मी पाहिलेली अमेरिका- भाग ६

अमेरिकेतील 'नाट्यगृह' आणि नाटक-'दि फँटम ऑफ दि ऑपेरा'


'दि फँटम ऑफ दि ऑपेरा' नावाचं  नाटक आम्ही पाहायला जाण्याचं ठरवलं. मूळात  'नाटक' हा माझा आवडीचा विषय. माझ्या घरीसुद्धा सगळ्यांना नाटकाची आवड. विशेषतः बाबांना. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच रंगभूमीवर आलेलं प्रत्येक नाटक आवडीने पाहिलं. मला आठवतंय.. 'रायगडाला जेव्हा जाग येते' हे नाटक मी तिसरीत असताना  पाहिलं होतं... शिवाय 'अश्रूंची झाली फुले', 'नटसम्राट', 'बटाट्याची चाळ', 'नकळत सारे घडले', संगीत सौभद्र, 'हसवा  फसवी', 'कोडमंत्र', 'मी नथुराम गोडसे बोलतोय', 'संगीत मस्त्यगंधा', 'संगीत संशयकल्लोळ'... यांसारखी  सगळीच दर्जेदार नाटकं पाहिली होती. 
त्यामुळे आता अमेरिकेत आल्यावर इथलं नाट्यगृह कसं असेल? रंगमंच कसा असेल ? इथे नाटक पाहायला येणारा  रसिक प्रेक्षक  कसा असेल...? अशा सगळ्याच गोष्टींबद्दल उत्सुकता मनात घेऊन मी नाटक पाहायला गेले. 
        
आम्ही सिऍटल मधल्या 'पॅरामाऊण्ट' नावाच्या नाट्यगृहात हे नाटक पाहायला गेलो होतो. या नाटकाचं पोस्टर पाहूनच नाटकाबद्दल उत्सुकता वाटत होती.


नाट्यगृहाच्या प्रवेश द्वाराजवळ असलेल्या रांगेत आम्ही उभे होतो. तिथे प्रत्येकाच्या  तिकिटावरचा कोड स्कॅन करून एकेका व्यक्तीला आत पाठवत होते. आपल्याइथे सुद्धा अशीच पद्धत आहे. तशीच पद्धत इथेही होती.  
नाट्यगृह रुबाबदार आणि मोठं आहे हे जाणवलं. मध्यभागी काचेचं मोठं झुंबर होतं. हजार बाराशे प्रेक्षक बसतील एवढी त्याची क्षमता होती.




        
      आम्ही जेव्हा आमच्या सीट वर बसलो आणि स्टेजकडे पाहिलं तेव्हा एक क्षण  मला आम्ही खूपच वर आहोत..आणि स्टेज  खूपच खाली आहे असं  जाणवलं. स्टेज  खूप खोल वाटतं होता. 
    रंगमंच.. लाल रंगाचा जाड कापडाचा पडदा, शिवाय नाट्यगृहात मध्यभागी असलेलं मोठं झुंबर... हे सगळं मी पाहत होते. आणि तेवढ्यात नाटक सुरु होणार असल्याची अनाउन्समेंट झाली. आम्ही मोबाईल वगैरे सायलेंट वर केले. पडदा उघडला आणि नाटक सुरु झालं. 
       इंग्रजी भाषेतलं नाटक आणि ते सुद्धा 'संगीत' नाटक मी पहिल्यांदी पाहत होते. काही गोष्टी कळत होत्या, काही कळत नव्हत्या. जेव्हा कलाकार गाण्यातून संवाद साधत होते तेव्हा गोष्ट समजायला कठीण जायची.. कारण त्या गाण्याची चाल.. आणि ते गाण्याचे बोल आपल्यासाठी  नेहमीचे नसल्यामुळे लक्षात यायचं नाही. पण साधारण देहबोली आणि चेहऱ्याच्या हावभावांवरून नाटकाची कथा कळत असल्यामुळे नाटक समजत होतं.  
          नाटक पाहताना माझं एकदम स्टेजच्या  एका  कोपऱ्याकडे लक्ष गेलं. तेव्हा एक व्यक्ती  स्टेजच्या  कोपऱ्यावर उभी  होती. ते काही माझ्या लक्षात आलं  नाही  तेव्हा विराज ला विचारल्यावर मला समजलं की, मुकबधीर व्यक्तींसाठी संपूर्ण नाटक त्यांच्या 'साईन' च्या भाषेत त्यांना सांगितलं जात आहे. अशा व्यक्तींसाठी एक वेगळी रांग असते. हे पाहून मला खूपच छान वाटलं. 
         
          'दि फँटम ऑफ दि ऑपेरा' ही एक कादंबरी आहे. या कादंबरीचे  मूळ  लेखक Gaston Leroux.जे  फ्रेंच जर्नलिस्ट होते. जर्नलिस्ट म्हणून काम करताना त्यांना काही नाटकांचं समीक्षण करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे या निमित्ताने त्यांचा अनेक ठिकाणी प्रवास होत होता.
ऑपेरा हाऊस  मध्ये  भूत आहे अशा काही अफवा त्याकाळी पसरल्या  होत्या. मग त्यांनी  कल्पना करायला सुरुवात केली की, हा 'फँटम' खरंच खरा असेल का? आणि याच धर्तीवर ही कादंबरी आहे..

जे भविष्यात  'नाटक' आणि 'चित्रपट' या दोन्ही प्रकारांत  समोर आलं.

 'दि फँटम ऑफ दि ऑपेरा' या नाटकाबद्द्ल-

संदर्भ स्रोत- विकिपीडिया 



कथानक- 

         अनेक कलाकार पण 'तीन' मुख्य पात्र याभोवती फिरणारी ही कथा आहे. जुनी  नाटक कंपनी जाऊन आता नवीन नाटक कंपनी येणार असते.. तोच व्यवस्थापन बदलण्याचा दिवस..  या प्रसंगापासून  नाटकाची सुरुवात होते. जुन्या नाटक कंपनी चा तो शेवटचा प्रयोग असतो. त्या नाटकातील मुख्य गायिकेचा आवाज बिघडतो त्यामुळे कोरस  मध्ये गाणाऱ्या 'क्रिस्टीन'ला  मुख्य गायिकेच्या जागी  गाणं सादर करण्याची संधी मिळते. 


ती तिच्या उत्तम आवाजाने सगळ्यांची मन  जिंकून घेते. पण नव्या नाटक कंपनीचं म्हणणं अजून तेच असतं  की,  'त्यांची पूर्वीची गायिका परत आल्यावर क्रिस्टीन ला मुख्य रोल देण्याची गरज नाही..' अशा विचारात ते  असतात. क्रिस्टीन ला त्या नाटकात पाहून, तिचा आवाज ऐकून प्रेक्षकांमध्ये बसलेला तिचा लहानपणीचा मित्र तिला ओळखतो आणि तिच्याबद्दल वाटणारं  प्रेम त्याला आठवतं. तो तिला भेटायला जातो..  तेव्हा ती तिच्या खोलीत नसते. 
क्रिस्टीन कुठे गेलेली असते? त्या ऑपेरा हाऊस  मधल्या भुताने तर तिला नेलं नाही ना? असा विचार आपल्या मनात येतो ना येतो... तसंच  काहीसं  घडतं. 


क्रिस्टीन विषयी थोडक्यात सांगायला गेलं तर, तिला तिच्या बाबांनी  लहानपणी सांगितलेलं असतं  की,  'एन्जल ऑफ म्युझिक' तुला शिकवायला येईल.   त्यामुळे जो फँटम  असतो म्हणजे भूत असतो ज्याच्याकडून ती अनेक वर्ष गाणं शिकत असते त्यालाच ती तिच्या बाबांच्या सांगण्याप्रमाणे  'एन्जल ऑफ म्युझिक' समजत असते. पण तिच्या बद्दल प्रेम वाटणाऱ्या तिच्या मित्राच्या लक्षात येतं  की  तो  'एन्जल ऑफ म्युझिक' नाही तर 'फँटम ऑफ ऑपेरा' आहे. क्रिस्टीन ला मुख्य पात्र म्हणून घेण्यासाठी तो एकदा त्या नाटक कंपनीला पत्र  पाठवतो.. शिवाय  बॅकस्टेज काम करणाऱ्या माणसाला मारून टाकतो. असे प्रसंग तिथे घडत असतात. तेव्हा ती त्याला घाबरायला लागते. कारण  आजपर्यंत त्याने त्याची ओळख जगासमोर आणलेली नसते. तेव्हा एकदा क्रिस्टीन त्याच्या जवळ जाते आणि चेहऱ्यावरचं मास्क काढते. तिच्या लक्षात येतं  की , हा कोणी 'एन्जल ऑफ म्युझिक' नाही तर भूत आहे. त्याला ओठ नसतात.. नाक नसतं. तो भूत म्हणजेच फँटम ऑफ ऑपेरा तिच्यावर प्रेम सुद्धा करत असतो. आणि एक अर्थाने तिला शिष्य सुद्धा मानत  असतो. हे सत्य समजल्यावर ती वडिलांच्या कबरीपाशी जाते. खूप रडते. आणि तिच्यावर प्रेम करणाऱ्या प्रियकराला भेटून त्याला सांगते .. 'मला यांच्यापासून वाचव'.  याने मला फसवलं आहे. 


    
        अशी कथानकात रंगत येत असते... आणि शेवटी फँटम, क्रिस्टीन आणि तिचा प्रियकर समोरासमोर येतात. त्यांच्यात झटाझटी.. मारामारी होते. 
एका क्षणी क्रिस्टीन लाच त्याची कीव  येते. आणि ती त्याच्यासोबत  वचनबद्ध राहण्याचा विचार करते. पण हे ऐकून त्याला जाणवत की,  आजपर्यंत त्याला तिच्याशिवाय कोणीच चांगलं मानलं नाहीये. तेव्हा तोच तिच्या जगातून जायचा निर्णय घेतो... 

यात नाटक पाहताना सगळ्यात मोठं आश्चर्य शेवटच्या या प्रसंगात वाटतं जेव्हा 'फँटम ऑफ ऑपेरा' नाटक पाहताना सुद्धा शेवटच्या क्षणी आपल्या समोर असताना नाहीसा होतो.. आणि त्याचे कपडे फक्त तिथे पडतात...
आणि इथे नाटकाचा शेवट होतो.
  

( Please Note- आत्ता  प्रवासांत  असल्यामुळे Youtube  वरील ब्लॉग अभिवाचन गुरुवारी म्हणजेच २९ नोव्हेंबर ला पब्लिश केले जाईल.) 








No comments:

Post a Comment