Saturday, November 17, 2018

मी पाहिलेली अमेरिका भाग ५

 नवे 'टास्क'- नवी 'निरीक्षणे'   


     नवं 'रुटीन' हे जसं एक नवं 'आव्हान' होतं. त्याचप्रमाणे, स्वतःचा रोल बदलल्यावर ओघाने बदललेल्या गोष्टी सुद्धा आता नव्या दिनक्रमात बसवायच्या होत्या. तुम्हाला खरं  सांगू ? नवा दिनक्रम बसवण्याचा हा आटापिटा सलग तीन महिने चालू होता. शिवाय सतत डोक्यात एकच  विचार.. 'करियरची नवी घडी बसवणे'. गंमत  म्हणजे घरच्यांशी आणि विराजशी बोलताना अनेकवेळा माझा हाच  विषय असायचा. मनात नेहमी विचार यायचा करियरची नवी घडी बसवतांना घरातल्या गोष्टींकडे सुद्धा दुर्लक्ष करायचं नाहीये. 'करियर आणि संसार' यातला समतोल यशस्वीरित्या सांभाळायचा होता. कारण या दोन्ही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी... त्यामुळे याचा परफेक्ट बॅलन्स  हा सुद्धा एक नवा टास्क होता.
       
मी मागच्या भागापासून सतत हेच म्हणतेय..हेच लिहितेय.. हा सुद्धा एक नवा टास्क होता.. तो सुद्धा टास्क होता.. ते एक खरंच आव्हान होतं .. वगैरे वगैरे. पण मी तर काय करू... इथे आल्यावर कितीतरी छोट्या गोष्टी माझ्यासाठी 'टास्क'च होत्या.

माफ करा... पण पुन्हा आता मी माझ्या या लाडक्या शब्दावर येणार आहे..  
अर्थातच समोर आलेल्या अजून काही आव्हानांबद्दल सांगणार आहे.. 


      खरं पाहायला गेलं तर, जेवण करता येत होतं. पण आता 'रोज' जेवण करायचंय ही गोष्ट नवी होती. पूर्वी तसं  पाहायला गेलं  तर सगळं हातात  मिळायचं.  पण आता..  भाजी कोणती  करायची या विचारापासून ती आणून, चिरून, फोडणीला टाकून... शिवाय  छान चव आणून आपल्यालाच तयार करायची आहे. 
     इथे ना कोणी 'मेड'  इथे सगळंच सेल्फ मेड. आपल्याइथे भारतात एखादी स्वयंपाकीण काकू घरी येऊन जेवण करतात  ती  संकल्पना इथे अगदीच कमी. त्यामुळे A to Z सगळं आपल्यालाच ठरवायचं असतं  आणि आपल्यालाच करायचं असतं. अगदीच कधी कंटाळा आला तर नवऱ्याची साथ ही असतेच पण मॅक्सिमम गोष्टी या घरातल्या मुख्य स्त्रीला पाहाव्या लागतात. अर्थात, या  विचाराचा कधीच त्रास वाटला  नाही पण एक जबाबदारी म्हणून नवी होती.  
    कालपर्यंत रोज जेवायचं आहे एवढच  माहित होतं.. पण आता रोज स्वतः जेवण करून मग जेवायचं आहे ही गोष्ट आता माझ्या रुटीन मध्ये कायमस्वरूपी add  झाली होती. 
        सुरुवातीला जेवण करायला खूप वेळ लागायचा..  साधारण दोन तास वगैरे... पण आता सरावाने हा स्पीड साधारण १ तासावर आला आहे. आणि  जेवणानंतरची  आवराआवर जशी अनेक स्त्रियांना   कंटाळवाणी वाटते त्याला मी सुद्धा अपवाद नव्हते. शिवाय  घरात काय आहे आणि काय संपलं आहे याकडे लक्ष ठेवून ते वेळेत घेऊन येणं तसच अतिशय महत्त्वाचं म्हणजे  किती जिन्नस आणायचं? या सगळ्याचा अंदाज आणि ही सगळी गणितं  डोक्यात बसायला सुद्धा वेळ द्यावा लागतो. 
      तर, आपल्या नेहमीच्या जेवणात  असणारी पीठं, डाळी अशा सगळ्या गोष्टी इंडियन स्टोअर मधेच मिळतात. एक दुकान आहे ते आमच्या घरापासून अर्धा तासाच्या अंतरावर आणि  बाकी प्रॉपर इंडियन स्टोअर आहेत ती दीड  तासाच्या अंतरावर...  
      घराजवळ अमेरिकन ग्रोसरी  स्टोअर आहे त्याचं  नाव  'सेफ वे'. इथे सगळ्या गोष्टी मिळतात पण भाज्या आणि फळं  सोडली तर बाकी अमेरिकन फूड म्हणजे फ्रोझन किंवा  ब्रेड बटर चीज यांसारखे पदार्थ आपल्या जेवणात रोज तर नसतातचं. त्यामुळे फळं  भाज्या सोडून बाकी आपल्या जेवणात असणारी पिठं  डाळी  वगैरे यांसारखे पदार्थ विशेष वेळ काढून आणायचे ही सुद्धा दिनक्रमात  नव्याने आलेली ऍक्टिव्हिटी. 

     आता मागे वळून पाहताना जाणवतंय की, या सगळ्या नव्या गोष्टी सांभाळत सांभाळत रुटीन लावताना खरतरं  दिवस कधी निघून जायचा तेच लक्षात यायचं नाही. भारतात बाकी सगळ्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना फोन करायची लिस्ट कधी प्रत्यक्षात उतरतच  नसे. कारण जसं मी मघाशी म्हंटल त्याप्रमाणे इथे सगळ्या गोष्टी  स्वतःलाच कराव्या लागतात..  अगदी पॅकेज रूम मध्ये जाऊन स्वतःच पार्सल आणण्यापासून ते घरातलं फर्निचर स्वतः इन्स्टॉल करण्यापर्यंत सगळंच..त्यामुळे फोन आणि विरुद्ध वेळा हा सुद्धा एक कायमस्वरूपी असलेला टास्कच...  

     पण एक गोष्ट मी इथे आवर्जून नमूद करेन  ती म्हणजे  सगळं स्वतः करण्यात सुद्धा खूप मजा असते. फक्त फरक इतकाच की ही सगळी  कामं  आपल्याला विशिष्ट वेळ देऊन करावी लागतात.  कारण अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी स्वतः करताना जेव्हा आपलं स्वतः काम म्हणजे माझ्या बाबतीत माझं लिखाण फक्त २०% व्हायचं तेव्हा लक्षात यायचं आता या नव्या वाढलेल्या  गोष्टींना धरून रुटीन सेट केलं पाहिजे. 

तर वर नमूद केलेल्या या सगळ्या गोष्टी होत्या ज्या मला नव्या रुटीनमध्ये सेट होताना टास्क वाटत होत्या..

पण शेवटी 'वेळ हेच सगळ्याच औषध असतं' म्हणतात त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी हळूहळू जमायला लागल्या. घरातला वावर, आजूबाजूचा परिसर, शिवाय इथली आजूबाजूची  फॉरेनर मंडळी आणि काही इंडियन्स अशा सगळ्यांच्या नव्याने झालेल्या ओळखी या सगळ्यामुळे अर्थातच एक 'कम्फर्ट' येऊ लागला. 
     यंदाच्या इथल्या माझ्या पहिल्या दिवाळीत मी जेव्हा घरासमोर रांगोळी स्टिकर आणि पणत्या ठेवत होते तेव्हा शेजारी राहणारी अमेरिकन लेडी हे सगळं पाहून मला आपल्या या सणाबद्दल  विचारात होती. तिला खूप उत्सुकता सुद्धा होती. त्यामुळे आम्ही आपला दिवाळी फराळ इथल्या आमच्या फॉरेनर मित्र-मैत्रिणींना सुद्धा दिला. यात त्यांना शंकरपाळे आणि चकली विशेष आवडली असं  सुद्धा त्यांनी सांगितलं. 
       त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर या नव्या वातावरणात रुळायला लागल्यावर माझं एकटीने बाहेर पडणं  सुद्धा सहज होऊ लागलं. कारण आता रस्ता  आत्मविश्वासाने क्रॉस करता येत होता. आजूबाजूचे  रस्ते माहित झाले होते.  माझा इथला मोबाईल नंबर वगैरे  या सगळ्याच गोष्टी आता होत्या. त्यामुळे अडचण काही आलीच तर विराज ला फोन करू शकत होते. कोणत्याही गल्लीबोळातून एकटीने चालत जायचं नाही मुख्य रस्त्यावरून जायचं हे विराजने मला सांगून ठेवलं होतं. 
त्यामुळे कुठे मी कधी जाणार असेल तर आम्ही कसं  जायचं यावर आधी बोलायचो... मग गुगल मॅप वर पाहायचे.. जर कधी मोबाईल ला काही प्रॉब्लेम झाला तर..म्हणून saferside त्याचे screenshots मी काढून ठेवायचे.  तर अशी सगळी तयारी करून मी बाहेर पडू लागले.   

एकटी बाहेर पडून प्रवास करायला लागले तशी  माझ्या डोक्यात फिट बसली ती म्हणजे मी केलेली माझी काही निरीक्षणं ...
मला जाणवलेल्या.. दिसलेल्या, वेगळ्या गोष्टी आणि काही निरीक्षणं आज तुमच्यासमोर मांडणार आहे. 

१. साधारण डाउनटाऊन च्या भागात ऑफिस ला जायच्या वेळेत खूप माणसं दिसतात पण त्यांनतर रस्त्यावर अगदी ३... ४ माणसं पाहायला मिळतात.
२. रस्त्यावर कोणीही रस्ता  क्रॉस करणारं  जरी नसलं  तरी गाडी चालवणारे रस्त्याचे नियम पाळतात.
३. इथे रस्त्यावरून चालताना अनोळखी व्यक्ती सुद्धा एकमेकांकडे पाहून हसतात. 
४. इथे आकाराने लहान  दुकानं ही संकल्पना नाहीच. सगळ्या दुकानांचा आकार हा बऱ्यापैकी मोठाच असतो. 
५. इथे 'बिल काउंटर' सोबत 'सेल्फ चेकआउट' चा सुद्धा पर्याय असतो.
६. इथे वस्तू खरेदी केल्यानंतर जर आपल्याला आवडली नसेल तरी आपण काही दिवसात  परत करू शकतो.  त्याचे पैसे परत केले जातात. इथली एक्ससेन्ज पॉलिसी चांगली आहे.
एकदा आम्ही आणलेलं  दूध खराब होतं. तेव्हा विराज  त्या दुकानात दूध घेऊन परत गेला तेव्हा त्यांनी फक्त पावती मागितली.. पैसे परत केले. बाकी काहीच प्रश्न विचारले सुद्धा नाहीत.  
७. हॉटेल मध्ये प्रत्येक पदार्थ हा अधिक प्रमाणात येतो. त्याची quantity अधिक असते.
८. इथे खाण्याचा पदार्थ पार्सल करताना to go हा शब्द वापरला जातो. आणि to go बॉक्स मध्ये तो दिला जातो.
९. इथे सुद्धा मॉल  बाहेर 'बेघर' आणि आर्थिक परिस्थिती कमकुवत असणारे लोकं  बसलेली असतात.. चेंज आहेत का ते विचारतात..  फक्त फरक इतकाच ते इंग्रजी भाषेतून पैसे मागतात.
१०. इथे उन्हाळा जुने ते सप्टेंबर पर्यंत असतो. तेव्हा रात्री ८ .. ९  वाजेपर्यंत संध्याकाळ असते. आणि अचानक रात्रीच्या ९. ३० ला वगैरे  अंधार पडतो.
११. इकडचा हिवाळा हा खरा हिवाळा असतो. शिवाय हिवाळ्यात ३. ...४ वाजताच अंधार पडायला सुरुवात होते.
 १२. इथे आपले सगळे सण  शनिवार- रविवारी साजरे केले जातात.
१३. आपल्या इथे चहा ला जेवढं महत्त्व आपण देतो तेवढच महत्त्व इथे कॉफी  ला दिलं  जात.
१४. अनेकवेळा चालत चालत कॉफी  पिण्याऱ्यांची संख्या सुद्धा अधिक प्रमाणात दिसून येते.
१५. इथे बाहेर ..मोकळ्या हवेत लॅपटॉप घेऊन किंवा पुस्तकं  घेऊन काम करण्याची आवड अनेकांना असते. 
१६. दुधाचे अनेक प्रकार असतात. फॅट फ्री, १% , २% मिल्क, होल  मिल्क. 
१७. इथे कुत्रा  पाळण्याचे वेड अधिक आहे.
१८. प्रत्येक घरी एक तरी कुत्रा पाळला आहे हे दिसून येते.
१९. इथे लहान बाळांचे आई वडील आणि ज्यांनी कुत्रा पाळला  आहे ते मालक  यांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांच्या लहान बाळांना आणि पाळलेल्या कुत्र्यांना आपण हात लावू शकत नाही किंवा त्यांच्याशी खेळू शकत नाही.
२०. कुठेही जाण्यासाठी इथे गुगल मॅप वापरला जातो.
२१. इथे झाडांना स्प्रिंकलर्स ने पाणी दिलं  जातं. 
२२. स्त्रियांचं सिगरेट ओढण्याच प्रमाण सर्रास दिसून येतं.  
------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाचकांचे अभिप्राय 
मागच्या भागातला  प्रश्न - तुमच्यासाठी 'रुटीन' या शब्दच महत्त्व किती आहे. 

अभिषेक काटदरे (रत्नागिरी)- "रूटीन" म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाशी आणि वेळेशी आपल्या Emotions ची होत जाणारी Connectivity....

सुकन्या धुमाळ (कल्याण) - रुटीन म्हणजे 'धाकधूक'. कारण एका विशिष्ट ब्रेक मधून किंवा सुट्टीहून परतताना एकच शब्द माझ्या डोक्यात सतत फिरत असतो तो म्हणजे रुटीन. बसेल की  नाही .. आपण  back to the pavilion सेट होऊ ना ..? हीच काय ती गमतीशीर धाकधूक. 





    

मी पाहिलेली अमेरिका- भाग ४

नवं  रुटीन: एक नवं आव्हान

जेटलॅगच्या गमतीशीर गोंधळातून आता मी हळूहळू बाहेर पडत होते. आणि झोपेचं नॉर्मल रुटीन आता लागत  होतं. हेच झोपेचं वेळापत्रक बसवण्याचा टास्क पूर्ण झाल्यावर माझ्यासमोर एक मोठ्ठा टास्क आता होता... तो म्हणजे या नव्या देशातला स्वतः एक नवा दिनक्रम बसवणे. एका सेट रुटीन मधून बाहेर पडून नव्या देशात, नव्या वातावरणात आता एक नवा दिनक्रम लावायचा होता. 
खरचं  तो एक 'टास्क' होता...  खरचं  ते एक 'आव्हान' होतं .

       स्वतःच नवं  रुटीन लावणं ही गोष्ट  वरवर  पाहता खूप सोपी असते. आपण आपल्या नेहमीच्या दिनक्रमात अनेकवेळा सहज बदल करत असतो. ते आपल्याकडून आपोआप होतातही. तेव्हा फरक इतकाच असतो की,  आपल्याकडून होणारा  बदल हा एक दोन गोष्टीतलाच असतो. 
पण इथे नवा दिनक्रम ठरवताना आजूबाजूच्या अगदी 'अथ'पासून 'इति'पर्यंतच्या सगळ्याच गोष्टी नव्या होत्या. नव्या वातावरणाची सवय नव्हती त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या असूनसुद्धा मला कठीण वाटत होत्या. आणि म्हणूनच रुटीन लावणं हा मोठा 'टास्क' वाटतं होता. शिवाय अनेक प्रयत्न करूनही, विचार करूनही दिवस ठरवल्याप्रमाणे छान जायचा नाही, काम व्हायचं नाही, घरच्यांची आठवण यायची..  तेव्हा रुटीन लागत नाहीये असं  वाटून पुन्हा निराशा यायची. पुन्हा स्वतःला  समजवायचे...  सगळ्या गोष्टी नव्या आहे.. होतील हळू हळू...  वगैरे वगैरे .. 
आणि प्रकर्षाने आठवायचे ते अनेकांचे शब्द.

      सुरुवातीला म्हणजेच लग्नाआधी जेव्हा सगळ्यांना कळायचं की,  लग्नानंतर मी अमेरिकेत जाणार आहे..  तेव्हा मला सगळे म्हणायचे, 'सहा महिने तरी तुला लागतील ऍडजेस्ट  होण्यासाठी'.. हे ऐकल्यावर माझ्या मनात आपोआप विचार यायचा. सहा महिने का लागतील?, इतकं काय वेगळं असणार आहे? विराज आणि मी तर रोज फोनवर बोलतो. आणि खरं  सांगायचं तर, आता बोलून बोलून तिकडच्या सगळ्याच गोष्टी  मला समजायला लागल्या आहे.. कळायला लागल्या आहेत. मला माहिती समजतेय..
     असे सगळेच मनात विचार यायचे. पण खरं  सांगू तर adjust  होण्यासाठी, सेट होण्यासाठी खरचं  खूप वेळ द्यावा लागतो. हे प्रत्यक्ष अनुभव घेताना माझ्या लक्षात आलं. आणि सगळ्यांचे शब्द आठवून  मला त्यांचं म्हणणं पटायला सुद्धा लागलं. 

     गंमत  म्हणजे इथे येण्याआधीच मी एक रुटीन ठरवून आले होते. पण ठरवून आलेल्या गोष्टीसुद्धा इथे नव्याने बसवतांना  मला वेळ लागला.. कदाचित सगळ्यांना लागतो.

       मला माझा इथला पहिला दिवस..  म्हणजे विराज ऑफिसला गेल्यावर पहिल्यांदी मी एकटी होते 'तो' दिवस खूप चांगला लक्षात राहिला आहे. आता खरं सांगू तर मला आठवून हसायला येतं. पण तेव्हा रडून रडून डोळे सुजले होते..
         तर, लग्नासाठी विराजने मोठी सुटी घेतली असल्यामुळे त्याला सोमवारी ऑफिस जॉईन करणं  महत्त्वाचं होतं. मी दिवसभर एकटी होते. 
हे घर सुद्धा माझ्यासाठी नवीन होतं. इथे राहून फक्त मला दोन दिवस झाले होते. त्यामुळे वावर सुद्धा कमीच होता. तेव्हा घरच्यांची प्रचंड आठवण येत होती. जेटलॅगची झोप डोळ्यावर होती.  इथली शांतात, कोणीच ओळखीचं नसल्याची भावना त्यामुळे अंगावर आलेला हा एकटेपणा... 
यामुळे खरंच मी खूप रडले. या वेस्टर्न कल्चर मध्ये मी कशी काय रुळणारं? इथे कुणीच बोलायला नाहीये.. घरी फोन करायचा..  तर ठराविक वेळेनंतर फोन तरी कसा करणार ...? सगळ्या वेळा विरुद्ध.. 
त्यामुळे एकूणच काय तर...  पहिल्या दिवशी मी फक्त फक्त फक्त रडले.
       
        विराजला मी आल्या आल्या सांगितलं,'आपण परत जाऊयात इंडियात.' मला येऊन फक्त दोन दिवस झाले होते आणि सगळ्यांची आठवण येत होती. म्हणून मी हे सगळं बोलत होते हे त्याच्या लक्षात आलं. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि फक्त तो आपुलकीने हसला. माझी सगळी इमोशनल अवस्था त्याला नीट समजत असल्यामुळे प्रत्येक वेळी त्याने मला खरं  सांगू तर सांभाळून घेतलं.
        इथे आल्यावर तिसऱ्या का चौथ्या दिवसाची गोष्ट आहे. एकाच दिवशी दोन वेळा केवढीतरी दचकले. ते दोन्ही आवाज कानाला नवे होते. त्यामुळे घाबरले. झालं असं की,  मी सकाळची आवराआवर करत होते. मोठ्ठं  काहीतरी पडल्याचा आवाज मला आला. मी धावत आले आणि खिडकितून  पाहू लागले. तेव्हा समोर मला काहीच दिसलं नाही. पण तो आवाज आता रोज येणार हे मात्र मला तेव्हा समजलं. तो आवाज कचरा घेऊन जाणाऱ्या गाडीचा होता. पण माहित नसल्यामुळे मी घाबरले होते. त्याच दिवशी थोड्यावेळाने परत काहीतरी आवाज आला.  तेव्हा तर आवाज कुठून येतोय हेच मला समजेना. 'फायर अलार्म' वाजतो हे माहित होतं पण कसा वाजतो ते माहित नव्हतं. त्यामुळे आता आवाज कुठून येतोय हे बराच वेळ लक्षातच येईना. पण मग दारापाशी जाऊन पाहिलं तेव्हा कळलं की, व्हॅक्युम क्लिनरने पॅसेज साफ केला जातोय. 

या सगळ्या सुरुवातीच्या गमतीजमती..

      नवं रुटीन लागायला वेळ का लागला याचा मागे जाऊन विचार केला की  जाणवतं .. कधी घरच्यांची आठवण यायची तर कधी एकटं  वाटायचं,  ओळखी नसल्यामुळे सुरुवातीला हा एकटेपणा, ही शांतता नकोशी व्हायची. तेव्हा वाटायचं, जे लोकं  खरंच एकटे असतात त्यांचं काय होतं  असेल..? मला तर आठ तास सुद्धा एकटं  बसवत नाहीये. 
       भारतात असताना मी एकटी राहिले नाहीये असं तर अजिबातच झालं नाहीये. पण इथला एकटेपणा सुरुवातीला अधिकच  जाणवत होता. मग आपल्याच  लॅपटॉप मध्ये आपणच अगदी छोट्या छोट्या आणि बारीक सारीक गोष्टींचे सेव्ह  करून ठेवलेले फोटो घरापासून लांब गेल्यावर किती मदत करतात हे जाणवलं. कित्तीतरी फोल्डरमध्ये असलेले फोटो हेच आठवण आल्यावरचं  बेस्ट सोल्युशन असायचं. 
      मोबाईल ला जसं  चार्जिंग लागतं  तसं आपल्या माणसंच भेटणं, त्यांचं आपल्या आजूबाजूला असणं  हे माझ्यासाठी एक प्रकारचं चार्जिंगच होतं. फोन आणि व्हिडिओ कॉल  जेव्हा कमी पडायचे तेव्हा फोटो आणि व्हिडीओ मला मदत करायचे. 
      इतकी घरापासून कधीच लांब राहिले नव्हते त्यामुळे अधिक जाणवायचं. हे सगळं सांगण्यामागचा हेतू इतकाच की, 'रुटीन' बसवताना या सगळ्या इमोशनल गोष्टी मध्ये यायच्या.. त्यामुळे कधी लिखाण व्हायचं नाही तर कधी लिखाण झालं नाही.. काम झालं नाही म्हणून बेचैन व्हायला होत असे. 
      असं  सगळं साधारण तीन महिने झालं. मग हळू हळू रुटीनला वळण  लागायला लागलं. 

     या भावनिक गोष्टींसोबत अजून काही गोष्टी होत्या...  ज्या रुटीनमध्ये सेट होताना एक टास्क बनत होत्या. शिवाय मी एकटी बाहेर जाऊ लागल्यानंतर मी पाहिलेल्या नव्या पद्धती आणि सोबत माझी काही निरीक्षणं पुढच्या भागात तुम्ही वाचणार आहात.

इथे आल्यावर मी अजून एक छान अनुभव घेतलाय बरं का... 

सगळ्यांशी फोन व्हायचा तेव्हा सगळे  मला काही 'कॉमन' प्रश्न विचारायचे आणि दरवेळी मी सगळ्यांना तीच उत्तरं  द्यायचे. 
मग त्या कॉमनली  विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची आणि उत्तरांची मला खूप गंमत  वाटायला लागली. आणि ते काही प्रश्न असे आहेत..

पण हो, (हा गमतीचा भाग आहे म्हणून मी लिहितेय.. ज्यांनी ज्यांनी मला हे प्रश्न विचारले त्यात त्यांचं भरपूर प्रेम आहे आणि मी त्याचा आदर करते.. या भावनेची कृपया नोंद घ्यावी आणि यात कुणालाही दुखवणे हा माझा मुळीच हेतू नाही.)
१. आत्ता  किती वाजलेत?
२. काय करतेस मग दिवसभर?
३. विराज डबा नेतो का?
४. 'आपले' कोणी ओळखीचे झाले का?
५. जवळपास इंडियन्स आहेत?
६. विराज किती वाजता येतो?
७. कुणी मैत्रीण झाली का?
८. तू जातेस का एकटी वगैरे?
९. रुटीन लागलं का?
१०. महाराष्ट्र मंडळात जा.. गेलीस का?
११. आज थंडी आहे?
१२. रूळलीस का आता तिथे ?

जाता जाता आजचा प्रश्न-
तुमच्यासाठी 'रुटीन' या शब्दाचं महत्त्व किती आहे? 
एका शब्दांत  किंवा एका वाक्यांत .


Sunday, November 4, 2018

मी पाहिलेली अमेरिका - भाग 3

जेटलॅग:  एक अनुभव

         आम्ही आता घरी आलो होतो. मी घर पाहिलं..अर्थात मला आवडलं. 
'आपलं घर' ही गोड  संकल्पना सुद्धा तेव्हा मी नव्याने अनुभवत होते. डोळ्यावर  प्रचंड झोप होती आणि पोटात न कळणारी भूक. 
आम्ही बॅगा ठेवल्या. जरा फ्रेश झालो आणि जेवायला खाली उतरलो. 
 जवळच म्हणजे दोन गल्ल्या सोडून..पण इथल्या पद्धतीनुसार गल्ली म्हणजे 'ब्लॉक'.. तर दोन ब्लॉक सोडून आम्ही 'अथीना ग्रील' नावाच्या एका रेस्टोरंट मध्ये जेवायला जात होतो.दुपारचे अडीच वाजले होते.मी  
पहिल्यांदी अमेरिकेतल्या हॉटेल मध्ये जेवणार होते... हाच विचार मनात चालू असताना मला या देशात मी घेत असलेला प्रत्येक श्वास सुद्धा त्यावेळी नवा कोरा आणि करकरीत वाटत होता. इतकं सगळं नवं नवं जाणवेल, वाटेल असं  या आधी खरचं वाटलं  नव्हतं. 


आता सिऍटल मध्ये येऊन मला काही तासचं झाले होते. खूप वेगळं वाटतं होतं. थोडक्यात सांगायचं तर मनात मिश्र भावना होत्या. या सगळ्याचा विचार करत आणि विराजशी गप्पा मारत मारत आम्हाला एक रस्ता क्रॉस करून जायचं होतं. तेव्हा नव्याने दिसले ते म्हणजे 'रस्त्याचे नियम'. 

इथे रस्ता क्रॉस करताना विशिष्ट नियमांचं पालन केलं जातं. ही शिस्त आणि पद्धत मला आवडली. पण गंमत म्हणजे  आत्मविश्वासाने रस्ता क्रॉस करायला मला  स्वतःला ८..१० दिवसांनी येऊ लागलं. 
हे लिहिताना आणि कोणालाही सांगताना आणि स्वतःला आठवताना मला  स्वतःलाच अधिक हसू येतं. खरं  सांगायचं तर,नियम डोळ्यासमोर ठेवून रस्ता क्रॉस करण्यात रॉकेट सायन्स अजिबात नाही. फक्त गोष्टी ऐकायला आणि  समजून घ्यायला  नव्या असतात म्हणून कदाचित त्यात रुळायला, ऍडजेस्ट व्हायला वेळ लागतो आणि तो वेळ आपल्याला द्यावा सुद्धा लागतो हा अनुभव मला तेव्हा पहिल्यांदी आला. 
आम्ही रस्ता क्रोस केला.. आणि हॉटेल मध्ये पोहोचलो. त्या लेडी वेटर ने  हसून आमचं स्वागत केलं. जेवणाची वेळ खरं  पाहता खूप पुढे गेली होती. त्यामुळे  चार-पाच जणांचा ग्रुप आणि आम्ही दोघे इतकेच त्या हॉटेल मध्ये होतो. तिने आम्हाला दोन कार्ड्स दिले. आणि सोबत पाणी ..
या पाण्याची एक गंमत आहे.  मी जुलै महिन्यात इथे आले आणि तेव्हा इथे उन्हाळा होता. इथल्या समर मध्ये म्हणजेच उन्हाळयात बर्फ घातलेलं थंड पाणी देतात आणि ते पाणी इकडची सगळीच माणसं सहज पिऊ शकतात. मला बर्फ घातलेलं पाणी पिता येत नव्हतं  त्यामुळे आम्ही नॉर्मल वॉटर तिला द्यायला सांगितलं. तिने आणून दिलं. पण मी ते पाणी सुद्धा पिऊ शकले नाही. कारण त्यात फक्त बर्फ नव्हता पण मला ते तितकंच  गार वाटत होतं.आणि ही  पाण्याची गंमत  माझी प्रत्येक हॉटेल मध्ये झाली आहे. 
त्यामुळे आता मला घरून पाण्याची बॉटल घेऊन जाण्याची सवय लागली आहे.  तर, हे पाण्याचं समीकरण अजून काही जमून आलं  नाहीये. 
     आत्तापर्यंत आमची ऑर्डर आली  होती .. आम्ही जेवत होतो. जेवत असताना तिने आम्हाला मधेच येऊन विचारलं... जेवण आवडलं का? 
तेव्हा मला एक नवी गोष्ट समजली..जेव्हा ते असं  विचारतात तेव्हा  ते फक्त एक फॉर्मालिटी  म्हणून अजिबात विचारत नाहीत.. 
जर आपल्याला खरंच जेवण आवडलं नाही.. चव आवडली नाही तर ते एकतर  तोच पदार्थ नवीन करतात किंवा आपल्याला दुसरं काही हवं आहे का ते विचारतात आणि जो पदार्थ आपल्याला आवडलेला नसतो त्याचं  बिल मात्र लावत नाहीत किंवा दोन्हीपैकी ज्याचं  बिल कमी ते पैसे बिलात धरतात. ही गोष्ट मला नवी वाटली होती आणि त्याचं  थोडं आश्चर्य सुद्धा. 
 पण आम्हाला ते जेवण आवडलं.. जरा फ्रेश सुद्धा वाटलं. बिल द्या असं  सांगताना विराज ने सांगितलं 'चेक प्लिज'...  इथे बिलला चेक म्हणतात हे सुद्धा तेव्हा कळलं. 
आता आम्ही  घराकडे निघालो होतो. ..पुन्हा मनात रस्त्याचे नियम सुरु झाले. तेव्हा काही क्षण वाटलं की, आता दरवेळी किती विचारपूर्वक मला चालायला पाहिजे. मनात येईल तसा  करून चालणार नाही... वगैरे वगैरे. 
        आम्ही घरी पोहोचलो... आणि डोळ्यावरची न कळणारी झोप काय ती आलीच.  देशांच्या वेळेमधली फरकामुळे झालेल्या झोपेच्या गणिताचा गोंधळ आणि बदलेलं  शरीराचं घड्याळ उर्फ जेटलॅग याचा अनुभव काय तो मी शेवटी घेतलाच. 'जेटलॅग' विषयी फक्त ऐकून होते पण अनुभव घेतल्याशिवाय त्या झोपेच्या गोंधळाची व्याख्या खरचं कळत नाही. 
घरी आल्यावर मी झोपले कधी आणि उठले कधी ... मला आठवत सुद्धा नाहीये. प्रचंड  झोप..आणि आजूबाजूला काय चालू आहे याचा अंदाज न येणं असा काहीसा अनुभव मी घेत होते. यावेळी जर आपण आपली दिवसा डोळ्यावर येणारी झोप कंट्रोल करू शकलो नाही तर रात्री आपण टक्कं  जागे असतो आणि मग हेच गणित आपल्याला बसवावं लागतं  अगदी ठरवून. 
       दुसऱ्यादिवशी घरच्यांचे सगळ्यांचे फोन..ते सगळे उत्साहात... कसा झाला प्रवास.. कसं वाटतंय ? वगैरे वगैरे... 
सगळी उत्तर विराज देत होता.. कारण मला काही बोलवेना.. मी बोलता बोलता सुद्धा कधी झोपले मला कळलं नाही.. आणि सगळे मला हसत होते.
विराज ला इतका त्रास झाला नाही कारण त्याला सवय होती.. पण त्याला धरून सगळ्यांना माझी खूप गंमत  वाटतं होती. त्या जेटलॅग च्या झोपेतल्या चेहऱ्याचा फोटो काढायचा राहून गेला असं  आज उगाच वाटतंय..
तर...   
प्रचंड जेटलॅगमुळे सगळ्यांना माझी वाटणारी गंमत आणि माझ्या डोळ्यावर असलेली अखंड झोप ..हाच काय तो लक्षात राहणारा माझा  जेटलॅग चा गमतीदार अनुभव.. 

भाग २ मध्ये विचारलेला प्रश्न- मी आकाशपाळणा असतो/असते तर... ?  
किंवा  लक्षात राहिलेला आकाशपाळण्यात बसण्याचा अनुभव. 

वाचकांचे अभिप्राय
अभिषेक काटदरे (रत्नागिरी)-  सगळ्या निसर्गाला त्याने जवळून पाहिलं असतं. त्याने मेल मध्ये खूप छान वर्णन केलं आहे.. त्यात त्याने शेवटी लिहिलं आहे की ,
तो जर आकाशपाळणा  असता तर  त्या उंचीवरून लोकांच जीवन हे एका वेगळ्या द्रुष्टीकोनातून मला बघायला मिळालं असतं. आणि त्याच जीवनाला सुखकर करण्यासाठी त्यांच्या 'आनंदाचा आकाशपाळणा' व्हायला मला नक्कीच आवडलं असतं !!
अनुजा खानोलकर (विरार)-  संपूर्ण बालपण वांद्र्याला गेलं, त्यामुळे माऊंट मेरीची जत्रा  आणि अर्थात आकाशपाळणा त्यांच्या व्यवस्थित लक्षात आहे असं त्या म्हणतात. त्या एकदा आकाशपाळण्यात बसल्या असताना काही वेळासाठी तो  बंद पडला, मी नॉर्मल होते पण वरच्या सीटवर बसलेल्या सात  वर्षाच्या मुलीने आकांडतांडव सुरु केला होता..तो आजही लक्षात राहिला आहे.


तर आता वेळ आहे त्या सरप्राईज ची... ज्याविषयी मी मागच्या भागात बोलले होते.. 
आज इथे 'डे लाईट सेविंग' पूर्ववत होणार आहे.. थोडक्यात घड्याळ बदलणार आहे. ते का .. कसं? या विषयी मी सविस्तर लिहिणार आहेच. आज होणारा  वेळेमधला बदल आज अनुभवायचा आहे. 
आता रात्रीचा एक वाजला आहे आणि आता १ वाजून एकूणसाठ मिनिटांनी दोन न वाजता पुन्हा १ वाजतील. 
( youtube च्या ब्लॉग अभिवाचनात याचा व्हिडीओ समाविष्ट करण्यात आला आहे .  )


सर्व वाचकांना आणि युट्युब वरील सर्व प्रेक्षकांना श्रोत्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !!!        




















Saturday, October 27, 2018

मी पाहिलेली अमेरिका - भाग २

'मी पाहिलेली अमेरिका' या ब्लॉग सिरीजला तुम्ही दिलेल्या अप्रतिम प्रतिसदाबद्दल मी  सर्वांची मनापासून आभारी आहे. 
मला सांगायला आनंद होतोय की,एकूण ९२२ वाचकांनी हा ब्लॉग वाचला आणि ३०० पेक्षा अधिक श्रोत्यांनी किंवा प्रेक्षकांनी ब्लॉग अभिवाचन ऐकले आहे.
आणि मी पहिल्या भागात एक प्रश्न विचारला होता.'अनोळखी, अपरिचित आणि नवीन' अशा मिश्र भावनांचा प्रवास करताना तुम्हाला कधी अनुभव आला आहे का? अनुभव ऐकायला आवडेल.  
तर काही वाचकांचे अभिप्राय माझ्यापर्यंत आले आहेत..त्याचा उल्लेख या भागाच्या शेवटी करणार आहे.
  
मी पाहिलेली अमेरिका - भाग २


 अपरिचित,अनोळखी,आणि नवीन अशा भावना मधे मधे  मनात येत  असल्या तरी सिऍटल  एअरपोर्टपासून  घरापर्यंतचा प्रवास करण्यासाठी माझं मन खूपच उत्सुक होतं. कारण शेवटी  'घरी' जाण्याचा आनंद हा वेगळाच असतो. 

Seattle-Tacoma International Airport 

घरी जाण्याचा उत्साह आणि आनंद मनात होता हे नक्की पण माझ्या चेहऱ्याकडे पाहून कोणालाच वाटलं नसतं असा माझा चेहरा होता.. काहीसा थकल्यासारखा. अठ्ठावीस तासाचा एकूण प्रवास.. त्यात दोन तासाचा हॉल्ट वगळता संपूर्ण प्रवास एकाच ठिकाणी बसून.. त्यामुळे 
आखडलेला जीव आणि वेळा बदलल्यामुळे बदलेलं शरीराचं घड्याळ.. अर्थात 'जेटलॅग'. इतका मोठा आणि सलग प्रवास बहुतेक आयुष्यातला पहिलाच प्रवास होता. पण तरी हा भला  मोठा   प्रवास finally  आता संपला होता. आणि आम्ही सिऍटलला उतरल्यावर भली मोठी रांग होती ती इमिग्रेशनची. या संपूर्ण प्रवासात इतकी मोठी रांग  इथेच शेवटच्या टप्प्यात लागली होती. रांगेत असताना  ते ऑफिसर्स काय विचारतील यावर आम्ही बोलत होतो. रांग  हळूहळू पुढे चालली होती. परदेशात येऊन गेले दोन दिवस फक्त एअरपोर्टच पाहत होते  त्यामुळे सिएटलला आल्यावर कधी एकदा एअरपोर्ट मधून बाहेर जातेय असं  एक क्षण मला वाटलं. पण फक्त एकच क्षण. तर ते ऑफिसर्स  काय  प्रश्न विचारतील याचा अंदाज आल्यावर त्या उत्तरांची उजळणी मी मनातल्या मनात करत होते. गोष्टी सोप्या होत्या पण तरी टेंशन आलं होतं. अर्ध्या पाऊण तासानंतर आमचा नंबर आला. त्या ऑफिसर्सनी प्रश्न विचारले. आम्ही उत्तर दिली. पासपोर्ट दिले. ठसे झाले. स्टॅम्प झाला... आणि त्यांनी मला सांगितलं... 
'वेलकम टू अमेरिका'... मी त्यांना हसून थँक्यू म्हटलं.


आम्ही आमच्या बॅगा  घेतल्या. कनेक्टिंग फ्लाईट्स असल्यामुळे इंडिया मध्ये दिलेल्या बॅगा  आता थेट सिऍटलला आल्यावर आम्ही घेत होतो.

उबर  बुक केली. त्या ड्रायव्हर ने हसून आमचं स्वागत केलं, विराजचं  आणि त्याचं  बोलणं झालं.. नॉर्मल ग्रीटिंग्ज.. त्याने आमच्या बॅगा  नीट लावल्या. आणि एअरपोर्ट पासून घरापर्यंतचा प्रवास अखेर सुरु झाला.

आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.. खऱ्या अर्थाने सहजीवनाची आता सुरुवात झाली हे मनोमनी जाणवत होतं.

मी खिडकीतून बाहेर पाहिलं. एअरपोर्ट च्या रस्त्यावरून आम्ही जात होतो. सुरुवातीला काहीसा इंडस्ट्रिअल भाग होता.

परदेश कसा आहे हे पाहताना मायदेशाची मला तेव्हा खूप आठवण येत होती. आपल्या देशात आपल्याला परकं कधीच वाटत नाही. याचा अनुभव त्याचक्षणी मला आला. आणि परदेश म्हणजे काय हे सुद्धा त्याचक्षणी मला जाणवलं. खूप लांब आले आहे सगळ्या माणसांच्या घोळक्यापासून असा विचार माझ्याही नकळत मी करत होते.पण मनातलं सगळं जाणणारा साथीदार सोबत होता त्यामुळे इथे रुळायला कमी वेळ लागला. हे त्याच्या शिवाय कधीच शक्य नव्हत. 
      
आपल्या एखाद्या गोष्टीपासून लांब गेल्यावर त्या गोष्टीची अधिक आठवण येते अगदी त्याचप्रमाणे मला घरच्यांची ...देशाची सारखी आठवण येत होती.

एअरपोर्ट जवळचा इंडस्ट्रिअल भाग आता आम्ही सोडला होता आणि सिएटलच्या डाउनटाऊनच्या दिशेने आमची उबर  जात होती. 
तेव्हा बाहेरचा परिसर पाहताना भर दुपारच्या उन्हात एका भल्यामोठ्या आकाशपाळण्याकडे आणि समुद्राकडे लक्ष गेलं. 
तो भलामोठा आकाशपाळणा म्हणजेच  'ग्रेट व्हील'. पर्यटकांच विशेष आकर्षण. 


याची उंची  १७५ फीट इतकी आहे. अमेरिकेच्या वेस्ट कोस्ट मधला  हा  सगळ्यात उंच आकाशपाळणा 


आणि त्या नितांत सुंदर निसर्गाला मी मनोमनी  नमस्कार केला. तो  आकाशपाळणा माझं   सिएटल  मध्ये स्वागतच करतोय असं  वाटून गेलं  आणि अचानक माझ्या चेहऱ्यावर हसू आलं....... मी मनातल्या मनात थँक्यू म्हंटल.

 त्या आकाशपाळण्याचा विचार मनात चालू असताना काही क्षणातचं  आम्ही  घरापाशी पोहोचलो. बिल्डिंग खाली गाडी उभी केली. त्या ड्रायव्हर ने सगळ्या बॅगा  काढून दिल्या. गाडीतून उतरलो. 

खरं सांगू तर,  सिऍटल मध्ये पहिलं पाऊल  ठेवल्यानंतरचा प्रसंग सुद्धा आजही जसाच्या तसा लक्षात आहे. या नव्या देशातलं  पहिलं  पाऊल. प्रचंड ऊन होतं. गाडीतून उतरल्या उतरल्या माझे डोळे अक्षरशः मिचकले.. समोर नीट पाहता सुद्धा येऊ नये इतका प्रखर प्रकाश डोळ्यावर आला. आणि देहाला नकळत जाणवत होती ती घरापासून जवळच असलेल्या समुद्रावरची थंडगार हवा. हा माझा सिऍटल मध्ये उतरल्यावर लक्षात राहिलेला प्रसंग. 
त्यानंतर आम्ही आमच्या जड  बॅगा घेतल्या आणि बिल्डिंग मध्ये प्रवेश केला. अगदी बिल्डिंग मध्ये प्रवेश करतानाच मला एक नवी पद्धत समजली इथे बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी 'गेटेड  एंट्री' असते. ती चिप असलेली व्यक्तीच बिल्डिंगमध्ये प्रवेश करू शकते अर्थात रहिवासी ... आता भारतात सुद्धा अनेक ठिकाणी ही पद्धत असते.. फक्त त्याचे प्रकार वेगळे असतात. 
तर... आम्ही बिल्डिंग मध्ये प्रवेश केला. एखाद्या आलिशान हॉटेल चा आवार  जसा असतो तसचं सगळं दिसत होतं. आम्ही लिफ्टपाशी उभे होतो. लिफ्ट समोर उभं न राहता त्याच्या बाजूला उभं राहून ... मग प्रवेश करण्याची सवय मला इथे आल्यावर लागली.  ही पद्धत नव्याने समजली आणि आवडली सुद्धा. 

धन्यवाद !!


पुढचा भाग जरा खास असणार आहे.. कारण त्यात मी जेटलॅग या माझ्या अनुभवाविषयी तर लिहिणार आहेच. आणि सोबत आहे एक सरप्राईज .. त्याची थोडी हिंट देते. मार्च महिन्याच्या दुसऱ्या रविवारी डे लाईट  टायमिंग बदललं होतं.. थोडक्यात घड्याळ बदललं होतं. आणि आता ते नोव्हेंबर च्या पहिल्या रविवारी पुन्हा स्टॅंडर्ड टायमिंग ला पूर्ववत होणार आहे. तर यात काय गम्मत असते.. हा  अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.. वेळ बदलतानाचा व्हिडीओ सुद्धा शेअर करणार आहे. 
त्यामुळे पुढचा भाग नक्की वाचा. 

जाता जाता ... आजचा प्रश्न 
मी आकाशपाळणा असतो/असते तर... ?  
किंवा  
लक्षात राहिलेला आकाशपाळण्यात बसण्याचा अनुभव फक्त १ शब्दांत 
  किंवा एका वाक्यांत


तुम्ही तुमचा अनुभव कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता किंवा मला मेल करू शकता. 


gmkashelkar@gmail.com 

वाचकांचे अभिप्राय- भाग १ 

'अनोळखी, अपरिचित आणि नवीन' अशा मिश्र भावनांचा प्रवास करताना तुम्हाला कधी अनुभव आला आहे का?  

(ठाणे)स्वाती भट- लंडनला  तिला अनोळखी वाटलं होतं. 

प्रसाद अग्निहोत्री- अमृतसर या ठिकाणी जेव्हा ते गेले तेव्हा ते हरवले होते तेव्हा त्यांना अनोळखी.. अपरिचित असा अनुभव आला.. 

(रत्नागिरी)अभिषेक काटदरे- सिक्कीम आणि दार्जिलिंग या ठिकाणी असा अनुभव आला.